वाहन धुण्यावर बंदी, पाणीगळती रोखण्यासाठी फिरते दुरुस्ती पथक, विहिरी-बोरवेलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेने घ्यावी; विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे नागरीकरण आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात शहराला गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः ऑक्टोबरनंतर आणि दिवाळीच्या काळात पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास त्याचे भीषण परिणाम नागरिकांना भोगावे लागू शकतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची वाट न पाहता महापालिका प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका प्रशासनाला सविस्तर निवेदन दिले आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या पुढे गेली असून वाहनांची संख्या, बांधकामे आणि औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. परिणामी पाण्यावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातील पाणीटंचाई ही केवळ पाणीपुरवठ्यापुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि शहराच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम करणारी ठरू शकते. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी महापालिकेने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे भोईर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शहरातील घरगुती नळ, व्यावसायिक इमारती आणि कार्यालयांमधील पाइपलाइनमधून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेने विशेष फिरते दुरुस्ती पथक स्थापन करावे. नागरिकांच्या मागणीनुसार नाममात्र शुल्कात किंवा मोफत गळती दुरुस्ती करून द्यावी. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय रोखता येईल, अशी सूचना त्यांनी केली आहे.
पिण्याच्या पाण्याने कार, दुचाकी किंवा अन्य वाहने धुण्यावर पूर्णपणे बंदी घालावी. वाहनांची स्वच्छता ओल्या फडक्याने करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच घरासमोरील अंगण, फरशी आणि पटांगण पाण्याने धुण्यासही मनाई करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जागेवरच किमान एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात यावा, अशी कठोर भूमिका भोईर यांनी मांडली आहे.
पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन मोठ्या नवीन बांधकामांना पाणी वापराबाबत तात्पुरती स्थगिती देण्याचा विचार करावा. शहरातील सार्वजनिक तसेच खासगी विहिरी आणि बोअरवेल यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन महापालिकेने करावे. उपलब्ध पाण्याचे योग्य वितरण करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पाणीटंचाईच्या काळात गरजू आणि कष्टकरी नागरिकांना दिलासा देण्यासाठी सेवाभावी संस्थांना आर्थिक व पायाभूत सहकार्य करावे. त्यांच्या माध्यमातून शहरात माफक दरात भोजन उपलब्ध करून देणारी झुणका-भाकर किंवा अन्नछत्र केंद्रे सुरू करावीत, असेही निवेदनात सुचविण्यात आले आहे.
शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन, उपलब्ध पाण्याचा साठा, वितरण आणि बचतीवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पाणी व्यवस्थापन समिती स्थापन करावी. या समितीची दर पंधरा दिवसांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा आणि आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
घरातील फ्लशचा अनावश्यक वापर टाळणे, शॉवरऐवजी बादलीने स्नान करणे, तसेच भांडी धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर झाडांसाठी करणे अशा उपायांबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी. त्याचबरोबर नागरिकांकडूनही पाणी बचतीसंदर्भात व्यावहारिक सूचना मागवाव्यात, असे भोईर यांनी सुचविले आहे.
About The Author

