Spread the love

मावळसह मुळशी आणि हवेली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

मावळ | प्रतिनिधी

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने मावळ तालुक्यातील भातशेतीला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी भाताच्या पिकांची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी उभे पीक करपून गेले आहे. भाताच्या ओंब्यांमध्ये दाणे भरले नसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नाणे मावळ परिसरातील नुकसानग्रस्त भातशेतीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत मिळण्यासाठी हा अहवाल शासनाकडे पाठविण्याची सूचनाही त्यांनी केली.

मावळ तालुक्यात यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली होती. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत परतीच्या पावसाने दडी मारल्याने भातपिकाला आवश्यक असलेल्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी, हिरवीगार दिसणारी भातशेती आता सुकू लागली आहे. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या असून, रोपांची वाढ थांबली आहे. काही ठिकाणी पीक पूर्णपणे करपल्याचे चित्र दिसत आहे. भाताच्या ओंब्या भरल्या नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण हंगामावर पाणी फिरण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

मावळ तालुक्यात सुमारे १२ हजार २८ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी भातपिकावर अवलंबून असल्याने पावसाअभावी झालेल्या नुकसानीचा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. बियाणे, खते, मजुरी आणि शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे खासदार बारणे यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, मावळ, मुळशी आणि हवेली या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्याची मागणी खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीकडेही यासंदर्भात मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी कृषी अधिकारी मारुती साळे, सहाय्यक कृषी अधिकारी पांचाली गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, मावळ तालुकाप्रमुख राम सावंत, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा

खासदार श्रीरंग बारणे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह नाणे मावळ परिसरातील शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानीची वस्तुस्थिती समजून घेत त्यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पंचनाम्यांची प्रक्रिया विलंब न लावता पूर्ण करावी, दोन दिवसांत सविस्तर अहवाल तयार करावा आणि तो राज्य शासनाकडे पाठवावा, असे त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *