Spread the love

हिंदूभूषण स्मारकाच्या विश्वविक्रमी सोहळ्याला सोशल मीडियावर मिळाली जागतिक प्रसिद्धी; ७५० हून अधिक रील निर्मात्यांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वांत उंच स्मारकाच्या ऐतिहासिक सोहळ्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचविणाऱ्या रील निर्मात्यांचा हिंदूभूषण स्मारक ट्रस्टच्या वतीने गौरव करण्यात आला. ट्रस्टने आयोजित केलेल्या ‘ब्लॉकब्लास्टर रील स्पर्धा-२०२६’मध्ये नाशिक येथील मयूर अहेर यांनी प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले. स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील ७५० हून अधिक रील निर्मात्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ढोल-ताशांच्या ऐतिहासिक विश्वविक्रमी मानवंदना सोहळ्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. मोशी येथील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ आणि निर्माणाधीन भगवा धर्मध्वज यांना अर्पण करण्यात आलेल्या या मानवंदना सोहळ्याचे क्षण रीलच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहमेळावा शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) मोशी येथील सीझन्स बँक्वेट येथे उत्साहात पार पडला. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, उद्योजक कार्तिक लांडगे, हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे सदस्य प्रतापराव मोहिते, पृथ्वीराज लांडगे, सुहास ताम्हाणे आदी उपस्थित होते. ट्रस्टचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला ६०० हून अधिक स्पर्धक उपस्थित होते.

स्पर्धेत यश कदम यांनी द्वितीय क्रमांक पटकावून ७५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. जय गाडे यांनी तृतीय क्रमांकासह ५० हजार रुपये, हिंदवी भोसले यांनी चतुर्थ क्रमांकासह २५ हजार रुपये, तर प्रणव यांनी पाचवा क्रमांक मिळवत १० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.

पहिल्या पाचही विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या पाच विजेत्यांना एकूण दोन लाख ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य रील निर्मात्यांनाही प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

कामगार नेते सचिन लांडगे म्हणाले, “रीलस्टार म्हणजे उद्याचा भारत घडवणारे युवक आहेत. देव, देश, धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. या स्पर्धेमुळे शिव-शंभू विचार जगाच्या कानाकोपऱ्यात आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे.”

पुढे बोलताना त्यांनी वारकरी संप्रदायासाठी पवित्र असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. या उपक्रमातही रील निर्मात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वांत उंच शिल्पाला ढोल-ताशा पथकांनी दिलेली मानवंदना जगभरात पोहोचविण्यासाठी रील निर्मात्यांनी पुढाकार घेतला. वास्तव आणि सत्य समाजासमोर मांडणारे रीलस्टार खऱ्या अर्थाने ‘रिअल स्टार’ आहेत. राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी आणि सशक्त राष्ट्र घडविण्यासाठी तरुणांनी योगदान द्यावे.”

या स्पर्धेच्या माध्यमातून डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून ऐतिहासिक सोहळा, सांस्कृतिक वारसा आणि शिव-शंभू विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. रील निर्मात्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देतानाच सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील जनजागृतीला चालना देणारा हा उपक्रम ठरला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *