Spread the love

रस्ते, आरोग्य सुविधांसह नागरी प्रकल्पांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरी सुविधांचा विस्तार आणि पायाभूत विकासाला गती देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या स्थायी समितीने विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. रस्त्यांचे डांबरीकरण, पदपथांची उभारणी, नाल्यांची दुरुस्ती, सार्वजनिक स्वच्छतागृहांचे नूतनीकरण, रुग्णालयांमधील अत्याधुनिक यंत्रणांची देखभाल अशा विविध स्वरूपांच्या कामांचा यात समावेश आहे. शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये प्रस्तावित असलेल्या विकासकामांसह आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित विषयांवरही समितीने सकारात्मक निर्णय घेतले.

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात स्थायी समितीची साप्ताहिक सभा पार पडली. या सभेत विविध विभागांकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर विचारविनिमय करून त्यांना मान्यता देण्यात आली.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी विविध प्रभागांतील कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक २२ मधील पवनानगर आणि आदर्शनगर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत परिसरात महापालिकेच्या ताब्यात आलेले डी.पी. आणि नॉन डी.पी. रस्ते विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ६ मधील धावडेवस्ती, गुळवेवस्ती, प्रभाग क्रमांक ८ मधील विविध सेक्टर, तसेच प्रभाग क्रमांक २० मधील विशाल थिएटर, संत तुकारामनगर, कासारवाडी आणि एमआयडीसी परिसरातील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण आणि पावसाळी जलवाहिन्यांच्या कामांनाही मंजुरी मिळाली. याशिवाय आकुर्डी गावठाण परिसरात स्ट्रॉर्म वॉटर लाईन, पदपथ आणि अन्य स्थापत्यविषयक कामे केली जाणार आहेत.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये पदपथांची उभारणी, नेहरूनगर व विठ्ठलनगरमधील स्थापत्य कामे, तर प्रभाग क्रमांक १० मधील शाहूनगर येथे रोड फर्निचरची कामे करण्यास मान्यता देण्यात आली. दिघी-बोपखेल, चोविसावाडी, वडमुखवाडी, मोशी आणि डुडूळगाव परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक आणि दिशादर्शक फलक उभारण्याच्या कामांचाही यात समावेश आहे.

आरोग्य सुविधांच्या दृष्टीने चिंचवड येथील तालेरा रुग्णालयातील एचव्हीएसी, ऑपरेशन थिएटर आणि विद्युत यंत्रणेची पुढील दोन वर्षे देखभाल व दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच वायसीएम रुग्णालयातील एक्स-रे विभागातील डिजिटल रेडिओग्राफी सिस्टिमची हमी कालावधी संपल्यानंतर मूळ उत्पादक कंपनीमार्फत देखभाल करण्यासाठी करार करण्यास मान्यता देण्यात आली.

दापोडी, निगडी आणि दिघी येथील पाच मुस्लिम व लिंगायत दफनभूमींच्या देखभालीसाठी नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित संस्थांना एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. सांगवी येथील महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल लॅब आणि दृश्याधारित शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ई-लर्निंग मॉड्यूल खर्चाच्या प्रस्तावाचे अवलोकन करण्यात आले. महिला आयटीआय कासारवाडी येथे अतिवृष्टीमुळे आवश्यक साहित्य खरेदी करण्यासही मंजुरी मिळाली.

याशिवाय विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपण, सीसीटीव्ही, जनरेटर आणि प्रकाशव्यवस्थेच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन मुदतवाढीचा तसेच प्रभाग क्रमांक १६, १७, १८ आणि २२ मधील वाहन, इंधन व चालकासह रिक्षा-टेम्पो व्यवस्थेच्या आठ महिन्यांच्या मुदतवाढीचा प्रस्तावही मंजूर झाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *