Spread the love

टॉवरमुळे वाहतुकीला अडथळा, अपघाताचा धोका लक्षात घेऊन आमदार महेश लांडगे आक्रमक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :

भोसरी-दिघी मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण अंतिम टप्प्यात आले असताना रस्त्याच्या अगदी मध्यभागी उभा असलेला २२० के.व्ही. अतिउच्च दाब विद्युत वाहिनीचा टॉवर वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. टॉवर क्रमांक १७ मुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा विद्युत मनोरा तातडीने स्थलांतरित करा, अशी ठाम भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

भोसरी-दिघी हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. नागरिकांची वाढती वर्दळ आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याचे रुंदीकरण आणि विकासकामे करण्यात येत आहेत. बहुतांश काम पूर्ण झाले असतानाही रस्त्याच्या मध्यभागी असलेला महापारेषणचा विद्युत टॉवर अद्याप हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे विकसित रस्त्याच्या वाहतुकीचे नियोजन करताना मोठी अडचण निर्माण होत आहे.

रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या मनोऱ्यामुळे वाहनचालकांना वाहतूक करताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच गर्दीच्या वेळेत दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांसाठी हा मनोरा धोकादायक ठरू शकतो. अवजड वाहनांच्या वाहतुकीलाही यामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतरही हा मनोरा कायम राहिल्यास वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे केवळ रस्ते विकास करून उपयोग नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अडथळेही दूर करणे आवश्यक असल्याचे आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले आहे.

या विद्युत मनोऱ्याच्या स्थलांतराबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने यापूर्वीच महापारेषण प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. दोन प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्रलंबित राहणे योग्य नाही. त्यामुळे संबंधित विभागांनी जबाबदारी निश्चित करून हा विषय मार्गी लावावा, अशी अपेक्षा आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

टॉवर क्रमांक १७ च्या स्थलांतरासाठी महापारेषण आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक आयोजित करावी. या बैठकीत मनोऱ्याच्या स्थलांतरासाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण, खर्चाचे अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक तरतुदी याबाबत ठोस निर्णय घ्यावा. तसेच, संपूर्ण प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा ठरवून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा कृती आराखडा तयार करावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

दरम्यान, शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करताना नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने विचारात घेतली पाहिजे. भोसरी-दिघी रस्त्यावरील विद्युत मनोऱ्याचा प्रश्न हा केवळ वाहतुकीचा अडथळा नसून संभाव्य अपघातांशी संबंधित गंभीर विषय आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रियांचे कारण पुढे करून या कामात आणखी विलंब करू नये. महापारेषण प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन टॉवर स्थलांतराचे काम मार्गी लावावे, अशी आग्रही भूमिका आमदार महेश लांडगे यांनी मांडली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *