मुंबई :- शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अधिकच वाढत चालल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले हेच सरकारचे अपयश आहे अशी टीका त्यांनी केली.
याबाबत ट्विट करताना ते म्हणाले की, कर्ज काढून पिक लावणी केली. मात्र अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेली. हाता तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले, हे सरकारचे खरे अपयश आहे.
गेल्या नऊ महिन्यांमध्ये विदर्भात १ हजार ५८४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या २५ वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे असे पाटील सांगितले. देश अमृतकाळ साजरा करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र विष पिऊन आत्महत्या करत आहे. ही धोक्याची घंटा सरकारने ओळखावी आणि शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करावी.