


तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन विसापूर किल्ल्यावर साजरा करण्यात आला. यानिमित्ताने काले येथील तलाठी श्री. सूर्यकांत राऊत यांचे हस्ते शिवमंदिरासमोर सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ध्वजारोहणासाठी भारतीय पुरात्त्व विभागाचे कर्मचारी रोहित नगिने, मच्छिंद्र वाघमारे, सतीश ढगे, देविदास ढगे तसेच, मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, चेतन जोशी ,सचिन निंबाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मंच गेली २४ वर्षे लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धनासाठी कार्यरत आहे. २०१६ साली पावसाळ्यात विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिर पूर्णपणे ढासळले होते. मंचाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भारतीय पुरातत्व विभागामार्फत २०१७ साली शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. यासाठी मंचाच्या कार्यकर्त्यांनी देखील श्रमदान केले. विसापूर किल्ल्यावर शिवमंदिर बांधल्यानंतर पुरातत्व विभाग मार्फत विसापूर किल्ल्यावर पुढे जीर्णोद्धाराची कुठलीही कामे झाले नाही. गडावरील अनेक राजवडे धान्य कोठार, दारू गोळा कोठार, अनेक मंदिरे, अनेक पाण्याच्या टाक्या, अस्ताव्यस्त पडलेल्या तोफा, ढासळलेल्या तटबंदी, गडावर येताना दगड धोंड्या मधली पायवाट अशा अनेक गोष्टींची दुरुस्ती ही ताबडतोब आवश्यक आहे त्यामुळे विसापूर किल्ल्यावरील संवर्धनाची कामे ताबडतोब सुरु करण्यात यावी अशी मागणी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केली. नुकतेच लोहगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी भारत सरकार तर्फे प्रस्ताव देण्यात आला आहे. ही बाब मावळवासियांसाठी व शिवप्रेमी साठी अतिशय अभिमानास्पद आहे. लोहगड किल्ल्याप्रमाणे विसापूर किल्ल्याचाही विकास चालू करावा अशी विनंती श्री शिवाजी रायगड स्मारक समिती संचलित लोहगड विसापूर विकास मंचतर्फे करण्यात आली.