


तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर एस. एस. सी. बॅच 1995 चे माजी विद्यार्थी आणि नाशिक येथील संपूर्णम् सेवा फाऊंडेशन या संस्थेच्या विद्यमाने शहरातील नागरिकांकडून 150 किलो देवदेवतांच्या भग्न अवस्थेतील प्रतिमा, मुर्त्या, देव्हारे आणि जीर्ण झालेले धार्मिक ग्रंथ, पोथ्या संकलन करून त्यांची विधिवत उत्तरपूजा करून पर्यावरण पूरक विघटन करण्याकरिता नाशिक येथे पाठविण्यात आले.
भग्न अवस्थेतील प्रतिमा, मुर्त्या, देव्हारे आणि जीर्ण ग्रंथ यांचे नक्की काय करावे हे माहित नसल्याने बरेचशे नागरिक या गोष्टी शहरातील ओढे किंवा तळ्यांच्या परिसरात ठेवत असल्याचे या माजी विध्यार्थ्यांना दिसून आल्याने शालेय मित्रांशी विचार विनिमय करून असे ठरवले की या साठी काही तरी केले पाहिजे, याविषयी त्यांनी शोध घेतला असता नाशिक येथील संपूर्णम् सेवा फाऊंडेशन या संस्थेबद्दल माहिती मिळाली, या संस्थेत सर्व देवतांच्या मुर्त्या आणि प्रतिमांचे व्यवस्थित वर्गीकरण करून त्यांची उत्तर पूजा केली जाते आणि पर्यावरण पूर्वक विघटन केले जाते. अर्थातच या सगळ्यासाठी काही खर्च येतो त्यानुसार 240 रु. प्रतिकिलो नुसार नागरिकांकडून शुल्क आकारण्यात आले. त्यानुसार दि. 26 जानेवारी 2025 रोजी ऍड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर प्रवेशद्वारावर संकलन उपक्रम आयोजित केला, सदर उपक्रमाचा सोशल मीडियावर प्रचार केल्याने तळेगावकरांनी सदर उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
या उपक्रमास ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग पोटे सर यांची मोलाची मदत झाली, शाळेच्या प्रांगणात हे संकलन करत असताना आम्हाला आवश्यक ते सर्व साहित्य उपलब्ध करून दिले त्या बद्दल त्यांचे विशेष आभार सर्व विद्यार्थ्यांनी मानले. या उपक्रमाला तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर निरीक्षक मोनिका झरेकर आणि याच बॅचचे विद्यार्थी व करसंकलन लिपिक प्रवीण माने यांनी विशेष उपस्थिती लावली आणि उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि प्रोत्साहन देण्यासाठी पुढील संकलनाच्या वेळी तळेगाव नगरपरिषद ही यात नक्कीच सहभागी होऊन मदत करेल असे आश्वासन दिले. तसेच नगरपरिषदेच्या वतीने तळेगावकरांना हा एक चांगला पर्याय अल्प दरात देण्याचे येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी राजश्री पडवळ, सुजाता माने, दीपाली शिंदे-गुरव, अनिरुद्ध जोशी, अमोल बुडखले, प्रशांत गुमल, नितीन खोल्लम, हेमंत घोडेकर, सचिन भेगडे, संजय बाविस्कर, मंगेश सरोदे, चंद्रकांत थिटे, सचिन हेंद्रे, सुधीर बोऱ्हाडे, संदीप कुटे, प्रशांत साखरे, प्रसाद मुंगी या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.