भाजपा आमदार महेश लांडगे यांची आग्रही मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील मोकळ्या जागेत ‘आयआयएम’ची शाखा सुरू करावी. त्याद्वारे परिसरातील उद्योग व रोजगार क्षेत्राला चालना द्यावी, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये चिखली, तळवडे, रुपीनगर, मोशी, चऱ्होली, दिघी, कुदळवाडी, बोऱ्हाडेवाडी गावांचा समावेश करण्यात आला. मात्र, २०१७ पर्यंत या गावांना पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागले. आम्ही २०१४ मध्ये समाविष्ट गावांच्या विकासाच्या मुद्यावर विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून याच मुद्यावर २०१७ मध्ये आपण महापालिका सार्वत्रिक निवडणूक आणि २०१९ मध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. या भागातील लोकांनी आपल्याला मोठी साथ दिली.
२०१७ मध्ये आपल्या नेतृत्त्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून समाविष्ट गावांतील विकासाचा अनुशेष भरुन काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही सुरू झाले. समाविष्ट गावांतील रस्त्यांचे जाळे, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, जिल्ह्यातील सर्वात मोठे ८५० बेडचे हॉस्पिटल, आंतराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, स्केटिंग ग्राउंड, डिअर सफारी पार्क, पिंपरी-चिंचवड न्यायालय संकूल असे विविध प्रकल्प मार्गी लावले आहेत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
‘एज्युकेशन हब’ चा अजेंडा…
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या साथीने आम्ही पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ‘एज्युकेशन हब’ व्हावी. याकरिता प्रयत्न करणार आहोत, असा अजेंडा महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवडकरांसमोर ठेवला होता. त्या अनुसरुन, आपण प्राधिकरण आणि महापालिकेच्या मोकळ्या जागांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय कला अकादमी सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. या पुढील काळात पिंपरी-चिंचवड शहराच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शाखा शहरात व्हावी व्हावी, अशी अपेक्षाही आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जमिनीची चाचपणी…
सध्यस्थितीला आयआयएम संस्थेकडून शाखा विस्तारासाठी जागेची पाहणी करण्यात येत आहे. त्यासाठी हवेली तहसिल प्रशासन आणि पुणे विभागीय प्रशासनाकडून शासकीय जागा व गायरान जमिनीच्या उपलब्धतेची चाचपणी सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्टा, मुंबई आणि पुणे शहराशी असलेली ‘कनेक्टिव्हीटी’ याचा विचार करुन शहरात आयआयएम शाखा सुरू करणे सोईचे होणार आहे.औद्योगिक शहरात आयआयएम सारखी संस्था सुरू झाल्यास रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच, पिंपरी-चिंचवडच्या लौकीकात भर पडेल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल आणि पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सकारात्मक पुढाकार घ्यावा. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआयएम संस्था प्रशासनाशी चर्चा करुन पिंपरी-चिंचवडमध्ये शाखा विस्तारासाठी सहकार्य कारावे, अशी मागणी केली आहे. त्याला निश्चितपणे सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.