पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात केलेल्या विकासाचा झंझावात सर्वज्ञात आहे. मात्र, आपणच सर्वज्ञानी असल्याच्या अविर्भावात मेहबूब शेख अजितदादांच्या क्षमतेबाबत प्रश्न विचारत आहेत. विकासाच्या मुद्यावर भाजपासोबत महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेवून आता १०० दिवस झाले. मात्र, अजितदादांवर टीका केल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही.
दादांसारखा वाघ होता… म्हणून तुमच्यासारख्या अनेकांना संधी मिळाली. कालपरवापर्यंत दादांच्या मागेपुढे करणाऱ्यांनी आपली राजकीय उंची तपासावी. ‘‘अजितदादांनी… राज्याबाहेर गेलेले प्रकल्प परत आणावेत’’ असा ज्ञानाविष्कार दाखवण्यापेक्षा आपले अस्थित्व टिकवण्यासाठी काय करावे? याचा अभ्यास करावा. अन्यथा आगामी काळात आम्ही जशात तसे उत्तर देवू.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास अजित पवार यांनीच केला, असे स्तूती कालपर्यंत करणारे कथित नेते दादांवर पात्रता नसताना बोलत आहेत. त्यामुळे त्यांना दादांच्या भाषेत सांगायचे झाले तर, ‘‘तुझा आवाका किती… बोलतो किती…’’ अशी परिस्थिती आहे. आमचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यावर बोलण्याची आपली उंची आहे का? याचा विचार करावा.
सन्माननीय शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांच्याबाबत आमच्या मनात कायम आदराचे स्थान आहे. मात्र, कोणपण उठतो आणि दादांबद्दल बोलतो हे आता खपवून घेतले जाणार नाही.
शहरातील स्थानिक आणि बाहेरून स्थायिक झालेल्या नागरिकांना अजित पवार यांच्या कामाचा झपाटा आणि धडाडी माहिती आहे. त्यामुळेच दादांच्या नेतृत्त्वात या शहरात सुमारे २० वर्षे लोकांनी दादांना साथ दिली. या शहरात मातब्बर नेते तयार झाले. याचे भान त्यांनी ठेवावे आणि मग अजितदादांबाबत बेताल वक्तव्य करावे. अन्यथा आपल्याला पद्धतशीर जागा दाखवली जाईल.