Spread the love

भाजपा आमदार महेश लांडगे यांची प्रशासनाला सूचना

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी आणि आकुर्डी येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सदनिका बांधून पूर्ण झाल्या आहेत. मात्र, ‘लकी ड्रॉ’ न काढल्याने लाभार्थ्यांना अद्याप घरांचा ताबा मिळाला नाही. सुमारे ११ हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यांचे लक्ष या सोडतीकडे आहे. त्यामुळे त्वरीत कार्यवाही करून ‘लकी ड्रॉ’ काढावा, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री आवास योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत पिंपरी, आकुर्डीत बांधलेल्या ९३८ घरांसाठी अर्ज मागविले आहेत. १० हजार रुपये अनामत रक्कम व ५०० रुपये नोंदणी शुल्कासह इच्छुक नागरिकांनी अर्ज केले आहेत. रस्ते आरक्षणामध्ये बाधित झालेल्या नागरिकांसाठी आकुर्डी येथील गृहप्रकल्प राखीव ठेवला होता.

आकुर्डीत ५६८ सदनिका आणि पिंपरीत ३७० सदनिका एक वर्षापासून बांधून तयार आहेत. मात्र, प्रशासनाने या प्रकल्पांसाठी अद्याप ’लकी ड्रॉ’ राबवलेली नाही. पिंपरीतील सदनिकेसाठी पात्र लाभार्थ्यास सात लाख ९२ हजार रुपये, आकुर्डीतील सदनिकेसाठी सात लाख ३५ हजार २५५ रुपये स्वहिस्सा भरावा लागणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरीतील प्रकल्पासाठी ४ हजार ६४६ अर्ज, आकुर्डी प्रकल्पासाठी ६ हजार ६९२ अर्ज असे एकूण १० हजार ११३ अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. या अर्जातून १३८ लाभार्थीना घर मिळणार आहे.

… तर डिसेंबरअखेर ताबा मिळेल!

‘प्रधानमंत्री आवास’ योजना अर्जाची छाननी करुन तात्काळ ‘लकी ड्रॉ’ काढणे अपेक्षीत आहे. सदर प्रकल्पाचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्याची ’लकी ड्रॉ’ लवकर काढल्यास डिसेंबरअखेर सदनिका ताब्यात मिळतील. लाभार्थीना कर्ज प्रक्रियेसाठीही वेळ लागणार आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षापूर्वी संबंधित लाभार्थी या प्रकल्पामध्ये हक्काच्या घरात स्थलांतरीत होतील, अशी व्यवस्था प्रशासनाने करावी. केंद्र सरकारकडून राबवण्यात आलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, निश्चित लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ निर्धारित वेळेत मिळाला पाहिजे, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घर या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजना देशभरात सक्षमपणे राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र, राज्य सरकार, पीएमआरडीए आणि पीसीएमसीच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे १९ हजार घरांची निर्मिती होत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. पिंपरी आणि आकुर्डी येथील प्रकल्पाचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. आता डिसेंबरपर्यंत लाभार्थी निश्चित करुन घरांचा ताबा संबंधितांना द्यावा. ज्यामुळे नवीन वर्षामध्ये त्या नागरिकांना हक्काच्या घरात प्रवेश करता येईल. याबाबत प्रशासन सक्षमपणे कार्यवाही करेल, अशी अपेक्षा आहे.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *