शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते, गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न, पायाभूत सुविधांबाबत उद्या (गुरुवारी) महापालिका, पीएमआरडीए, एमएसआरडीसी, एनएचआयच्या अधिका-यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
महापालिकेतील आयुक्त दालनात गुरुवारी सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रावेत, किवळे, पुनावळे हा भाग झपाट्याने विकसित होत आहे. मोठ-मोठ्या गृहनिर्माण संस्था उभारत आहेत. महापालिका गृहप्रकल्पांना मान्यता देते. पण, या सोसायट्यांमधील सभासदांना मुबलक पायाभूत सोयी-सुविधा मिळत नाहीत. डेव्हलपमेंट शुल्क घेणा-या पालिकेची सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी आहे. पण, ती पूर्ण होत नाही. त्यामुळे विनाकारण त्यांचा लोकप्रतिनींधवर रोष वाढतो.
पीएमआरडीए हद्दीचा देखील झपाट्याने विकास होत आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. देहूरोड बाह्यवळण मार्गावर एनएचआय रस्ता विकसित करणार आहे. त्यासाठी महापालिकेने जागेचे भूसंपादन करुन द्यायचे आहे. या सर्व प्रश्नांचा एकत्रिक आढावा घेण्यात येणार आहे. चारही संस्थांना असलेले अडथळे, अडचणी दूर केल्या जाणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.