पिंपरी : प्रतिनिधी
निवडणूक आचासंहिता जाहीर होण्या अगोदरच चिंचवड विधानसभा मतदार संघात राजकीय वातावरण तापू लागले आहे.ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे निवडणूक लढविण्यासाठी आक्रमक झाले असून उद्या ते रहाटणी येथील थोपटे लॉन येथे राजकीय भूमिका स्पष्ट करणार असले तरी त्यांना कोणाचा पाठींबा आहे ? कोणत्या राजकीय पक्षाचे तिकीट घेणार? अशा प्रकारच्या अनेक राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढविण्याचे मनसुबे उघड केले आहेत. राजकारणामध्ये डावलले गेल्याचा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आरोप केला असून आता मतदारांशी थेट संवाद साधून निवडणुकीची पुढची दिशा उद्याच्या जाहीर मेळाव्यात करण्याचे त्यांनी सांगितले आहे.
भोईर यांची आघाडी…
चिंचवड विधानसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उमेदवार निवडीवरून एक वाक्यता दिसत नाही. प्रत्येक घटकास नवीन उमेदवाराचे नाव चर्चेत येताना दिसते. वंचित आघाडी,मनसे,आरपीआय या पक्षाकडून ही उमेदवारी बाबत स्पष्टता दिसत नाही.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची एकंदरीत निवडणुकीबाबत परिस्थिती पाहता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांबाबत सावध भूमिका घेतलेली असून महायुती होणार का ? आघाडी होणार का ? आणि झालाच तर उमेदवार कोण असेल ? याबाबत केवळ चर्चा सुरू असताना भाऊसाहेब भोईर यांनी आता पर्यंत मतदार संघात एक लाख मतदारापर्यंत पोहचून निवडणुकीत आघाडीवर असल्याचे जाहीर केले आहे तसेच ते उद्या राजकीय भूमिका ही जाहीर करत आहेत. भाऊसाहेब भोईर कोणत्या पक्षात जाणार ? त्यांच्या समवेत कोण कोण असेल ? कोणाचा पाठींबा घेणार ? या बाबत राजकीय तर्क वितर्क लढविले जात असून त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्याच मिळणार आहेत.