Spread the love

श्रावण हर्डीकर यांच्याकडून तातडीने कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी राज्य शासनाने महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेत डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून बुधवारी (दि.११) आदेश जारी करण्यात आला. सध्या कोकण विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. सूर्यवंशी यांची बदली करून त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाने हा आदेश जारी करताना महापालिका आयुक्त पद अधिकालिक वेतन श्रेणीत उन्नत करून त्यावर डॉ. सूर्यवंशी यांची नियुक्ती केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या सल्ल्याने इतर अधिकाऱ्याकडे सोपवून तातडीने पिंपरी चिंचवड येथे नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत असलेले श्रावण हर्डीकर यांच्याकडून डॉ. सूर्यवंशी यांनी लवकरात लवकर कार्यभार स्वीकारावा, असेही शासनाने निर्देश दिले आहेत. शासनाच्या या आदेशामुळे महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठा बदल होणार आहे.
दरम्यान, बदलीच्या आदेशानुसार नवीन पदावर रुजू झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी “सुप्रिमो” प्रणालीवर रूजू अहवाल अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ईआर शीटमधील पोस्टिंग कॉलममध्ये माहिती नोंदवून त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाला कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
याशिवाय कार्यभार हस्तांतरण आणि स्वीकार प्रक्रियेदरम्यान १७ नोव्हेंबर २०२० रोजी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेशात नमूद आहे. नवीन पदस्थापनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल आणि कार्यमूल्यांकन अहवाल नियमानुसार आणि वेळेत तयार करण्याची जबाबदारीही नव्या अधिकाऱ्यावर राहणार आहे.
शासनाने नव्या पदस्थापनेनंतर प्रशासनात डिजिटल प्रणालींचा वापर वाढवण्यावरही भर दिला आहे. महापालिकेच्या कामकाजात ई-ऑफिस तसेच e-HRMS प्रणालीचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *