Spread the love

कन्नड | प्रतिनिधी – सोमनाथ पवार
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जैतापूर येथे आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख करून देणारी दोन दिवसीय एरोडायनामिक्स व रोबोटिक्स कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) शिक्षणाचा अनुभव घेतला.
अमेरिकन इंडिया फाउंडेशन (AIF) आणि अटलासियन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘डिजिटल इक्वलायझर’ कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना एरोडायनामिक्सचे मूलभूत तत्त्व, हवेचा दाब, उड्डाणाची संकल्पना याबाबत सखोल माहिती देण्यात आली. तसेच विविध प्रयोग व मॉडेल्सच्या सहाय्याने हे तत्त्व प्रत्यक्ष दाखविण्यात आले. रोबोटिक्स सत्रात विद्यार्थ्यांनी रोबोट्सची रचना, त्यांचे कार्य व आधुनिक तंत्रज्ञानातील उपयोग याबाबत माहिती घेतली. प्रोजेक्ट-आधारित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनी स्वतः मॉडेल्स हाताळून पाहिली आणि विज्ञानातील संकल्पना सहज समजून घेतल्या.
या कार्यशाळेसाठी तामिळनाडूतील चेन्नई येथून आलेल्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. डीजी सेलर संस्थेचे इलैया राजा, नितीन रुपेश, रामकुमार, संतोष कुमार, प्रिया आणि भुवनेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना एरोडायनामिक्स व रोबोटिक्सचे प्रात्यक्षिकासह सखोल प्रशिक्षण दिले.
या उपक्रमात जि.प. शाळा जैतापूर, जि.प. शाळा बोडखा, प्रशाला हतनूर आणि राष्ट्रीय विद्यालय जैतापूर येथील विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन व समारोप प्रसंगी पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर झाल्टे, शिक्षण विस्तार अधिकारी मनिष दिवेकर, अमेरिकन इंडिया फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी शाम उगले, मुख्याध्यापक बाळासाहेब शेलार, डॉ. शशिकांत शेजूळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानेश्वर दरेकर, चैतन्य पोटे, रोहित शिंगारे, नानासाहेब गव्हांडे, विजय सोनवणे, नरेंद्र देसले, गुरुनाथ नाकाडे, निलेश काथार, श्रीमती किरण पाटील आणि मुकेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड वाढून त्यांच्या भविष्यातील संधींना नवे पंख मिळाले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *