काठी व चाकूने हल्ला, भावालाही मारहाण; ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाख
कन्नड : प्रतिनिधी
तालुक्यातील आडगाव जे येथे ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राहुल बाबासाहेब बहिरव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील अवैध दारू विक्रीच्या कारणावरून हा वाद उफाळला. शांताराम उर्फ रवी शिवाजी सोनवणे याला दारू विक्री करू नये, असे बहिरव यांनी समजावून सांगितल्याचा राग मनात धरून त्याने १५ मार्च रोजी सकाळी सुमारे १० वाजता आकाश झिमन यांच्या किराणा दुकानासमोर बहिरव यांच्यावर हल्ला केला.
यावेळी आरोपीने प्रथम वेळूच्या काठीने त्यांच्या हातावर वार करत गंभीर दुखापत केली. त्यानंतर चाकूने पायावर वार करून जखमी केले. या घटनेत बहिरव खाली पडल्यावरही आरोपीने धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. उपस्थित ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून त्यांना वाचवले.
यानंतर बहिरव हे आपल्या भावासोबत पोलीस ठाण्याकडे जात असताना आडगाव चौफुली येथे आरोपी व त्याच्या वडिलांनी त्यांचा पुन्हा पाठलाग करून गाडी अडवली. यावेळी दोघांनी मिळून बहिरव व त्यांच्या भावाला काठी व हाताने मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या भावालाही दुखापत झाली आहे.
या प्रकरणी पुढील तपास बीट जमादार संदीप कनकुटे करीत आहेत.
About The Author

