विकेंद्रित कचरा व्यवस्थापनासाठी आमदार महेश लांडगे आक्रमक!
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
मोशी येथील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, वाढती दुर्गंधी, पर्यावरणीय प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील संपूर्ण कचरा एकाच ठिकाणी जमा करण्याऐवजी प्रभागनिहाय कचरा संकलन आणि प्रक्रिया व्यवस्था निर्माण करण्याची मागणी मोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. या प्रश्नावर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेत महापालिका प्रशासनासह आवश्यकतेनुसार राज्य शासनाकडेही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
मोशीतील ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक घटकांच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेऊन कचरा डेपोमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी नागरिकांनी कचरा डेपोची सद्यस्थिती, वाढता कचऱ्याचा भार, पर्यावरणावर होणारे परिणाम आणि प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. डेपोची प्रत्यक्ष तांत्रिक तपासणी करून त्याच्या क्षमतेचा आणि पर्यावरणीय परिणामांचा वस्तुनिष्ठ अहवाल नागरिकांसमोर मांडण्याची मागणी करण्यात आली.
शहराच्या विविध भागांतून गोळा होणारा कचरा मोशी येथे आणण्याऐवजी कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण यंत्रणा विकेंद्रित करण्याचा मुद्दा ग्रामस्थांनी ठामपणे मांडला. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात स्वतंत्र, आधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने चालणारी कचरा प्रक्रिया केंद्रे उभारावीत. ओला आणि सुका कचरा उगमस्थानीच वेगळा करण्याची प्रभावी व्यवस्था राबवावी. त्यामुळे मोशी कचरा डेपोवरील ताण कमी होऊन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कचऱ्यातून निर्माण होणारे दूषित द्रव (लिचेट) इंद्रायणी नदीत मिसळत असल्याची गंभीर तक्रारही नागरिकांनी केली. या प्रकरणाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नदीच्या पाण्याचे नमुने तपासावेत आणि तपासणीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय डेपो परिसरातील हवा, पाणी आणि मातीच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्याबरोबरच स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याची सूचनाही निवेदनाद्वारे करण्यात आली.
कचरा डेपोच्या भविष्यातील वापराबाबत स्पष्ट धोरण निश्चित करून त्याच्या क्षमतेचा, पर्यावरण संरक्षणाचा आणि प्रदूषण नियंत्रणाचा कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रक्रियेत स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणविषयक तज्ज्ञांना सहभागी करून घ्यावे, अशीही मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांचे आरोग्य, पर्यावरणाचे संरक्षण आणि इंद्रायणी नदीचे संवर्धन या बाबी महत्त्वाच्या असल्याचे स्पष्ट केले. या प्रश्नावर महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. आवश्यक असल्यास राज्य शासनाच्या स्तरावरही हा विषय मांडून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक निखिल बोऱ्हाडे, नगरसेविका अर्चना सस्ते, सारिका बोऱ्हाडे, सुजाता बोराटे, सारिका गायकवाड, नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे, माजी नगरसेविका कविता आल्हाट, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, अतिश बारणे, ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, निलेश बोराटे, प्रकाश आल्हाट, निखिल सस्ते, नितीन बोऱ्हाडे, राजेश सस्ते यांच्यासह ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
About The Author

