पिंपरी : पुढील निवडणुका फसव्या विकासाच्या मुद्द्यांवर न होता, विचारांवर लढल्या जातील. आता सामान्य माणूस योग्य विचार करूनच निर्णय घेतील. सध्या परिस्थिती अवघड असली तरी मतदार राजा विवेक बुद्धीने निर्णय घेईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पिंपरी येथे केले.
सोमवारी पिंपरीतील आचार्य यात्रे रंगमंदिर येथे अशोक सार्वजनिक विकास सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या स्मृतीशेष डॉ. अशोक शीलवंत यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन व पुरस्कार वितरण सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस खासदार श्रीनिवास पाटील, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, कार्यक्रमाच्या संयोजिका, माजी नगरसेविका डॉ. सुलक्षणा शीलवंत – धर, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा, माजी महापौर कवीचंद भाट, राजरतन भंते, माजी नगरसेवक माई काटे, मुक्ता पडवळ, बबन गाढवे, मोहम्मद भाई पानसरे, मारुती भापकर तसेच ॲड. राजरत्न शिलवंत, पुरस्कार विजेते माजी आमदार जयदेव गायकवाड, संपादक संजय आवटे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, भाऊसाहेब डोळस, चंद्रकांत शेटे, स्वाती सामक आदी उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले की, सम्राट अशोक यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम डॉ. अशोक शिलवंत यांनी केले आहे .मणिपूरच्या हिंसक घटना पाहता आमचा शिक्षणाचा पाया कमकुवत आहे असे वाटते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या एका मताची किंमत दाखवून दिली आहे. या एका मताने देशाची सत्ता बदलता येते हे आता सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. बदललेल्या परिस्थितीत देशात लोकशाही टिकवण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने, सुजाण मतदारांनी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पुढील निवडणुका फसव्या विकासावर न होता विचारांवर होतील. आता सामान्य माणूस योग्य विचार करूनच निर्णय घेतील असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, मिळवणं आपल्यासाठी असते तर जुळवनं समाजासाठी असते, असे नेहमी समाजासाठी जुळवण्याचे काम डॉ. अशोक शीलवंत यांनी केले आहे. त्यांचाच वारसा त्यांची कन्या डॉ. सुलक्षणा आणि पुत्र राजरतन करीत आहेत याचा निश्चित अभिमान आहे.
यावेळी संत तुकाराम नगर मधील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि शहरातील विविध सामाजिक संस्था ट्रस्ट यांना आर्थिक मदतीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
श्रीपाल सबनीस यांनी सांगितले की, विश्वशांतीचा विचार शेवटच्या क्षणापर्यंत डॉ. अशोक शीलवंत यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांचा परिवार काम करीत आहे. त्यांचे व्यक्तिमत्व सात्विक राजकारण, समाजकारण धर्मकारण करणारे होते. सर्व महापुरुषांच्या संचितांचे बीज अशोक शिलवंत यांच्यामध्ये मला जाणवतात.
स्वागत, प्रास्ताविक सुलक्षणा शीलवंत – धर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिलीप कांबळे आभार ॲड. राजरत्न शीलवंत यांनी मानले.