Spread the love

पिंपरी : निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने आज (सोमवारी) मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच काम सुरु होऊन निगडीपर्यंत मेट्रो धावेल असा विश्वास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मेट्रो मार्ग होता. आता पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा 13.9 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. पिंपरी नव्हे निगडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याची शहरवासीयांची मागणी होती. त्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले होते. खासदार बारणे यांच्या पाठपुराव्याने राज्य शासनाने निगडीपर्यंतच्या मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. बारणे यांनी केंद्र सरकारची मान्यता मिळावी यासाठी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली होती. अखेरीस बारणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून निगडीपर्यंतच्या मेट्रोला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. मान्यता दिल्याचे पत्र केंद्र सरकारचे सचिव सुनील कुमार यांनी राज्य शासनाला पाठविले आहे.

याबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन दशकांत झपाट्याने नागरीकरण आणि लक्षणीय लोकसंख्या आणि रोजगार वाढ झाली आहे. शहराची लोकसंख्या 2011 मध्ये 17.27 लाखांवरून 2017 मध्ये अंदाजे 21 लाखांपर्यंत वाढली आहे. 2028 पर्यंत 30.9 लाख आणि 2038 पर्यंत 39.1 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आकुर्डी, चिंचवड आणि निगडी परिसरातील नागरिकांची निगडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.

पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके असतील. या विस्तारित मार्गासाठी होणाऱ्या खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. हा प्रस्तावित कॉरिडॉर 4.13 किमी लांबीचा असून तो एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणून बांधला जाईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे खर्च 910.18 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आता लवकरच निगडीपर्यंतच्या मेट्रो कामाला सुरुवात होईल. वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प फायदेशीर ठरणार असल्याचे खासदार बारणे म्हणाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *