पिंपरी :- निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आणि पिंपरी चिंचवडकरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मेट्रो निगडीपर्यंत लवकरच धावेल, फक्त एका सहीसाठी फाईल दिल्लीत आहे असं सूचक वक्तव्य जाहीररीत्या केले होते. त्यानंतर आज (दि.२३) निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुती सरकारमधील सर्व पक्षाचे आभार मानतो. तसेच लवकरच निगडीपर्यंत मेट्रो धावणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीएल बस वाहतूक सोबत मेट्रो निगडी पर्यंत धावली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आग्रही मागणी होती. पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने आज मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात १ ऑगस्ट २०२३ पासून पिंपरी ते दापोडी असा ७.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या वेळी पिंपरी ते सिव्हील कोर्ट अशी १३.९ किलोमीटर मेट्रो धावू लागली आहे.
यापूर्वी असणाऱ्या विरोधी पक्षाच्या चुकीच्या नियोजनामुळे मेट्रो महामार्ग निगडी पर्यंत न धावता पिंपरी पर्यंतच करण्यात आला होता. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मेट्रो महामार्ग निगडीपर्यंत जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. त्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी घेऊन प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून दिला होता तो मागील काही दिवसापासून प्रलंबित होता. मात्र, राज्यात पुन्हा सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजितदादा पवार यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा घेतला. आज केंद्र सरकारने निगडी पर्यंत मेट्रो महामार्ग होण्यास हिरवा कंदील दिला आहे. यामुळे आकुर्डी, चिंचवड, निगडी, तळवडे, चिखली परिसरातील नागरिकांची निगडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना पुणे शहर सोबत चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे असं संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.