Spread the love

पुणे : प्रतिनिधी

राज्यातील अनेक घटक सध्या आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज आरक्षण मागत आहेत. याविषयी सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा विशेष अधिवेशन बोलवावं. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील वाद, रशियाचा वाद यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने संसदेचं अधिवेशन किंवा सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवली पाहिजे. तसंच, महाराष्ट्रात आरोग्य, शिक्षण, आरक्षणाचे मुद्दे अशी गंभीर आव्हानं राज्यासमोर आहेत. त्यामुळे मला वाटतं की, राज्य प्रचंड अस्थिर आहे. परंतु सरकार चर्चा करण्यास तयार नाही. केवळ तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यामुळे राज्याची देशात प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यामुळे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी असे प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राज्यात सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व आज पालघरमध्ये अंमली पदार्थ निर्मितीचे कारखाने असल्याचे समोर आले आहे. या कारखान्यांतून हजारो कोटींचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. ड्रग्ज प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राचे नाव खराब होत आहे. ड्रग्जबाबत मी एक नागरिक, आई, लोकप्रतिनिधी म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तर मागत आहे. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार नेमके करते तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र होताना पाहायचं का ? सरकारचे चालले तरी काय ? अनेक गोष्टीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लक्ष नाही. राज्यात गुन्हेगारी वाढली, कोयता वापर वाढला, ड्रग्ज तस्करी फोफावली, महिला अत्याचार, आरक्षण वाद सुरु असे अनेक प्रश्न आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्वी रोज टीव्हीवर दिसत. परंतु आता ते काही उत्तर देत नाहीत. राज्यात शाळा कमी होऊन दारुची दुकाने वाढत आहेत. हाच छत्रपती शिवाजी, शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे का? याचे उत्तर सरकारने द्यावे. असे सुप्रियाताई सुळे यांनी सरकारला विचारले आहे

सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या की, गृहमंत्रालयाचं हे पूर्णपणे अपयश आहे. राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार काय काम करतंय. चाललंय तरी काय ? गृहमंत्री करतायत काय ? अनेक गोष्टींत गृहमंत्रालयाचं लक्षच नाहीय. सरकारचा डेटाच सांगतोय की, राज्यात गुन्हेगारी वाढतेय. खोके वापर करुन जे सरकार सध्या सत्तेत आले आहे, त्यांनी आता काम तरी करावे, अशी जनतेची इच्छा आहे. परंतु, सरकार फक्त खोक्यांमध्येच व्यस्त आहे. तरुणांनी आत्महत्या करण्यापेक्षा सरकारला जाब विचारावा. ड्रग्ज प्रकरणात सरकार अपयशी आहे. त्यामुळे याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला पाहिजे. असेही सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले.

बीड येथे झालेल्या घटनेवर गृहमंत्रालयाने उत्तर द्यावं. जे गृहमंत्री टीव्ही असायचे की, मी तोंड उघडलं की, असं होईल तसं होईल म्हणायचे, आम्ही वाट पाहतोय. ड्रग्समध्ये काय नेक्सस आहे ? बीडमधील घटनेवर सरकार काय करणार आहे ? ट्रिपल इंजिन सरकार पक्ष फोडणे, ईडी, सीबीआय, आयकर विभाग, खोक्याचा धदा करणे एवढंच करतंय. महाराष्ट्राचं हे दुर्दैवं आहे. आरोग्याच्या समस्या, नांदेडमधील घटना, शाळा कमी होतायत आणि दारूची दुकाने वाढतात. छत्रपती आणि शाहू- फुलेंचा हा महाराष्ट्र आहे का ? असा प्रश्नही सुप्रियाताई सुळे यांनी विचारला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *