पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका भरती प्रक्रियेतील नव्याने भरती प्रक्रिया करुन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना तात्काळ रुजू करुन घ्यावे, अशी मागणी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाकाजावर प्रचंड ताण असून, मनुष्यबळ भरती अपरिहार्य आहे. राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठवल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १५ पदांच्या ३८८ जागांसाठी परीक्षा घेतली होती. त्यासाठी राज्यभरातून ८५ हजाराहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते.
महापालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, न्यायालय लिपिक, ॲनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गातील रिक्त जागांसाठी प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवली आहे. त्याची परीक्षा झाली असून, उमेदवारांना नियुक्ती देणे प्रलंबित आहे.
दरम्यान, संबंधित उमेदवारांना रुजू करुन न घेतल्यामुळे तक्रारी येत आहेत. प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी, तसेच पात्र उमेदवारांना न्याय देण्यासाठी तातडीने रुजू करुन घ्यावे, अशीही मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.
महापालिका नोकर भरतीमध्ये पात्र झालेल्या ३८८ उमेदवारांना अद्याप रुजू करण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या सर्वच विभागामध्ये रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली होती. पुरेशा मनुष्यबळाअभावी प्रशासकीय कामकाजावर ताण येत आहे. दुसरीकडे, पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबत तक्रारी सुरू झाल्या आहेत. याबाबत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी आणि संबंधित उमेदवारांना रुजू करुन घ्यावे, अशी सूचना केली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.