सातारा : सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. चित्रलेखा माने-कदम यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष (मुख्यालय) माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी हा अन्य पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे. अन्य पक्षात घराणेशाही, कुटुंबशाहीला महत्व दिले जाते. भाजपामध्ये कार्य,कर्तृत्व पाहून संधी दिली जाते. त्यामुळेच अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म झालेले नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. चित्रलेखा माने- कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाचे स्थान दिले जाईल, असेही श्री . बावनकुळे यांनी नमूद केले.
सौ. चित्रलेखा माने-कदम यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध आघाड्यांवर मोठ्या धडाक्याने विकास कामे करून देशाला प्रगतीपथावर नेले आहे. देशाच्या विकासाची दृष्टी भाजपा नेतृत्वाकडे असल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी आपण निष्ठेने पार पडू असेही त्या म्हणाल्या.
सौ.चित्रलेखा माने-कदम या रहिमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष आहेत. परिसरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांत त्यांनी योगदान दिले आहे. सौ . माने यांच्या बरोबर डॉ. राजकुवर राणे, अमरसिंह जाधवराव, माजी उपनगराध्यक्ष माधुरी भोसले तसेच अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.