Spread the love

पिंपरी : मावळमध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. या कामांना गती द्यावी. दर्जेदार, टिकाऊ स्वरूपाची कामे करावीत. कामाच्या दर्जात कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही. दर्जाहीन कामे झाल्यास चौकशी केली जाईल असा इशारा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे दिला. तसेच मावळातील विविध कार्यालयातील अधिकारी वेळेवर जागेवर हजर नसतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मावळ तालुक्यातील विविध विभागाची तालुकास्तरीय आढावा बैठक शुक्रवारी खासदार बारणे यांनी घेतली. वडगाव येथील पंचायत समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस तहसीलदार विक्रम देशमुख, गट विकास अधिकारी सुधीर भागवत, तळेगांव दाभाडे नगरपरिदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे धनराज दराडे, कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ,विद्युत विभागाचे शिवाजी चव्हाण, गट विकास शिक्षण अधिकारी एस. आर. वाळूंज, शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे , आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, साहेबराव कारके,सुनिल ढोरे,अंकुश देशमुख,विशाल हुलावळे उपस्थित होते.

मावळातील 114 गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठाची कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठा निधी मिळाला आहे. 27 गावातील कामे पूर्ण झाली आहेत. काही गावातील कामांच्या दर्जाबाबत सरपंच, नागरिकांनी तक्रारी केल्या. खासदार बारणे या तक्रारींची दखल घेतली. निविदेतील अटी-शर्तीप्रमाणे कामे करावीत. कामाचा दर्जा राखावा. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. तत्काळ निराकरण करावे. यापुढे कामांच्या दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. कार्ला फाटा ते एकविरा देवीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत खासदार बारणे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली. रस्ते, पाणी, वीज, जातीचे दाखले याबाबत नागरिकांच्या तक्रारी येऊ देऊ नका, वेळेवर आणि दर्जेदार सुविधा पुरवाव्यात. तसेच सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या शाळांच्या कामाचाही आढावा त्यांनी घेतला. कंपन्याकडून सीएसआर निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही खासदार बारणे म्हणाले.

 

आता बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी

ग्रामीण भाग असल्याने अधिकारी कार्यालयात वेळेवर येताना दिसत नाहीत. विलंबाने येतात. त्यांना वेळेचे गांभीर्य नाही. अधिकारी जागेवर नसल्याने नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे मावळातील सर्व शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करावी. त्याबाबत सर्व कार्यालयात मशीन बसविण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *