Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळालं आहे. अशातच मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, अशी चर्चा राज्यभर रंगली असतानाच अजितदादा भावी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी मावळातील तरुणांनी अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले आहे. अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत व मावळचे आमदार सुनिल शेळके यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे अशा आशयाचा तीस फुटाचा मोठा बॅनर ८०० फुट उंचीच्या नागफणी कड्यावरून झळकावून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नागफणी कडा हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा लगतच्या घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा, चढाईला अतिशय दुर्गम व कठीण आहे. असा हा कठीण असलेला ड्युक्स नोज उर्फ नागफणी कडा.

गिर्यारोहणाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साह्याशिवाय या सुळक्यावरील चढाई अवघड मानली जाते,परंतु हा अवघड सुळका सर करून विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान मिळावे हे ध्येय उराशी बाळगून जिद्द आणि धाडसाच्या जोरावर या युवा गिर्यारोहकांनी नागफणी सुळक्यावर बॅनर झळकावला आहे. या मोहिमेत मावळातील नारायण मालपोटे, नितीन पिंगळे, विशाल गोपाळे, अजित गोपाळे व पांडुरंग जाचक यांनी सहभाग घेतला होता.

 

आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत गिर्यारोहकांना खुणावणारे अनेक सुळके आपण पाहतो.या अवघड सुळक्यांवर गिर्यारोहक निसर्गाशी सामना करीत यशस्वीरीत्या चढाई करतात. अशाच सुमारे ८०० फूट उंचीच्या नागफणी सुळक्यावर मावळातील तरुणांनी यशस्वीरित्या चढाई करून वाऱ्याच्या वेगाचा सामना करीत 30 फुटी मोठा बॅनर झळकावला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *