Spread the love

मावळ : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त बारा शिवकालीन गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला पाठवला आहे. त्यात मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा समावेश असल्याने शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी भारतातर्फे २०२४-२५ साठी सादर होणाऱ्या प्रस्तावात महाराष्ट्रातले नऊ गिरीदुर्ग व तीन जलदुर्ग अशा बारा गडकोटांना नामांकन देण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांनी केलेला पराक्रम, लष्करीदृष्ट्या केलेली गडकोटांची बांधणी याची दखल आता जागतिक स्तरावर घेतली जावी यासाठी केंद्राने एक पाऊल पुढे टाकले आहे. वारसा स्थळाच्या नामांकनासाठी शिवछत्रपतींचे जन्मस्थळ शिवनेरीसह, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, द्वितीय राजधानी रायगड सह साल्हेर,लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग,पन्हाळा,सिंधुदुर्गआणि विजयदुर्ग त्याचबरोबर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे.

मावळ तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणजे लोहगड किल्ल्याचा समावेश या मानांकनात केला आहे. त्यामुळे लोहगडला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त होईल. लोहगड किल्ला व परिसराचा प्रचंड कायापालट होईल. जगभरातून पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी येतील. नवीन नवीन प्रकल्प या ठिकाणी येतील. मावळचे प्रमुख पर्यटन केंद्र लोहगड होईल. त्यामुळे स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल व पर्यायाने या परिसराचा विकास होईल.

लोहगडचा इतिहास : पुरंदरच्या तहामध्ये मोघलांकडे हा किल्ला गेला होता. सुरतची संपत्ती या ठिकाणी ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड. या गडावर नेताजी पालकर, कान्होजी आंग्रे यांचे काही काळ वास्तव्य होते. तसेच पेशवे काळात नाना फडणवीस यांचे पण या किल्ल्यावर वास्तव्य होते. त्यांच्या काळात त्यांनी या गडाची काही डागडुजी केली होती. गडावर सोळा कोन असलेला तलाव आहे, शिवमंदिर आहे, गडाला पाच दरवाजे आहेत. विंचू कडामाची, जिथे सुरतची संपत्ती ठेवली होती अशी लक्ष्मी कोठी, भक्कम बुरुंज, तटबंदी, सुंदर अशा पायऱ्या तसेच गड परिसरामध्ये समोर असलेले तुंग, तिकोना व विसापूर हे किल्ले. जवळची पवना नदी व पवना धरण हे देखील गडाच्या वैभवात भर घालते.

लोहगड परिसराचा मोठा विकास : लोहगडास जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यास येथील दळणवळण पूर्णपणे सुधारले जाईल. लोहगडस येणारे तिन्ही रोड मोठे होतील . मळवली मार्गे, दुधीवरी खिंडी मार्गे , पवना नगर वरून भातराशी मार्गे त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल. हे सर्व रस्ते शासनाला प्रशस्त करावे लागेल . त्याचबरोबर मळवली इथून जाणारा मुंबई पुणे सुपर हायवे याला ही हा रोड जोडला तर तो पुण्या मुंबईच्या पर्यटकांसाठी सुवर्णसंधी असेल. जगभरातील पर्यटक या ठिकाणी येणार म्हटल्यावर या सुधारणा होणे आवश्यकच आहे . पर्यटक आले की स्वाभाविक हॉटेल व्यवसाय , ट्रान्सपोर्ट व्यवसाय, याची मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. ग्रामस्थांना प्रत्येकाला रोजी रोटी उपलब्ध होईल. मळवली रेल्वे स्टेशन हे मोठे जंक्शन झाल्यास एक्सप्रेस पण या ठिकाणी थांबतील .व अजून या भागाचा विकास मोठा होईल.

विसापूर किल्ला : विसापूर किल्ला हा मावळातील एक मोठा किल्ला आहे. याचे सुंदर तटबंदी, आकर्षक बुरुंज, धान्य कोठार ,दारुगोळा कोठार, मोठे राजवाडे, प्रचंड पाण्याच्या टाक्या, जाती ,मंदिरे ,आणि गडावरून दिसणारे सुंदर निसर्गाचे रूप अशा एक ना अनेक गोष्टीमुळे विसापूर पर्यटकांचे आकर्षण केंद्र होत आहे. विसापूर चा इतिहास पण खूप मोठा आहे. हे सर्व प्रकाश झोतात आणले पाहिजे . लोहगड प्रमाणे विसापूरचा ही विकास पुरातत्व विभागाने चालू केला पाहिजे. विसापूर ला जाण्यासाठी आता चांगला रोड नाही,पायऱ्या नाही , ही पर्यटकांची मोठी समस्या आहे. प्रशासनाने या गोष्टीकडे ताबडतोब लक्ष देणे आवश्यक आहे.

लोहगडावर सुधारणा : श्री. शिवाजी रायगड मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचतर्फे सर्वप्रथम गडावरील जीर्ण झालेले शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर महाशिवरात्री यात्रा चालू झाली. पुरातत्व विभागाने गडाला नवीन गणेश दरवाजा बसवला. मंचाने पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी गडाच्या सुधारणांचा पाठपुरावा केला. पुरातत्व विभागाने चांगली साथ दिली. गडाला पायऱ्या, बुरुज, तटबंदी आदींच्या दुरुस्तीची कामे चालू झाली. त्याचवेळी विसापूरवरील शिव मंदिर जीर्ण होऊन पडल्यानंतर त्याचाही पाठपुरावा मंचाने केला व तेथील शिवमंदिर पुरातत्व विभागाने बांधले. अशा प्रकारे लोहगड विसापूरचा कायापालट होत आहे.

युनोस्को च्या जागतिक वारसा यादीत नामांकनासाठी लोहगडचा समावेश केल्याबद्दल मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, मार्गदर्शक संदीप गाडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार,अनिकेत आंबेकर, सचिन निंबाळकर,गणेश उंडे,चेतन जोशी,बसाप्पा भंडारी,अमोल गोरे आदींसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

 

लोहगड -विसापूर विकास मंच गेली २५ वर्षे या ठिकाणी काम करत आहे. लोहगड विसापूरचा विकास हेच मंचाचे प्रमुख ध्येय आहे. लोहगड पायथ्याला शिवस्मारक बांधले आहे. त्याच्याभोवती भव्य शिवसृष्टी उभी करायची आहे. या ठिकाणी येणाऱ्या जगभरातील पर्यटकांना शिवरायांचा पराक्रमी इतिहास पाहता आला पाहिजे. त्यासाठी शासनाने या ठिकाणी भव्य अशा शिवसृष्टीला मोठी मदत करावी.

– सचिन टेकवडे, संस्थापक, लोहगड – विसापूर विकास मंच.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *