Spread the love

मावळ : लोकसभा मतदारसंघातील कर्जत-खोपोली मार्गावरील आवळस येथे 102 फुटाच्या ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे. सिंहगड एक्सप्रेसला महिलांसाठी वेगळा डबा जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईला जाणा-या महिलांना दिलासा मिळणार आहे. कार्यान्वित असलेल्या रेल्वेच्या कामांना गती देण्याचे निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिका-यांना दिले.

मध्य रेल्वेच्या लोणावळा ते पनवेल, कर्जत, उरण या मुंबई विभागाची मावळचे खासदार बारणे यांनी बुधवारी बैठक घेतली. रेल्वे व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल, अतिरिक्त व्यवस्थापक अखलाक अहमद, कालिया सर, अरुण सर, गौतम सर, रामचंदर सर उपस्थित होते. खासदार बारणे यांनी लोणावळा, कर्जत, नेरळ, उरण, पनवेलमध्ये चालू असलेल्या कामांचा आढावा घेतला. त्याबाबतची सविस्तर माहिती घेत कामाला गती देण्याच्या आणि ओव्हर ब्रीजची कामे वेळेत मार्गी लावण्याचे निर्देश दिले. सिंहगड एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी वेगळा डबा जोडावा अशी मागणी होती. त्यावर सीएसटी रेल्वे स्टेशन येथे डबा जोडण्याचे आश्वासन अधिका-यांनी दिले आहे.

प्रवाशांसाठी नेरळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म एक, दोन येथे शेड बनविण्यात येत आहेत. लोणावळा रेल्वे स्थानकांवर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे लोणावळा स्थानकाला आदर्श स्थानक बनविण्याची कार्यवाही सुरु आहे. पनवेल रेल्वे स्थानक येथील कोचिंग कॉम्प्लेक्सचे काम प्रगतीपथावर आहे. एका टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच सुरु केले जाणार आहे. पनवेल रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण, आधुनिकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. पनवेल ते उरण दरम्यान लवकरच लोकल ट्रेन सुरु केली जाईल अशी हमी अधिका-यांनी दिली असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. लोणावळा, कर्जत, नेरळ, पनवेल या रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *