Spread the love

पिंपरी । प्रतिनिधी

श्री गणेश सहकारी बँकेच्या स्थापनेपासून तळागाळातील घटकांसाठी ही बँक महत्वपूर्ण ठरली आहे. लोकसेवेचा वसा घेतलेल्या या बँकेची स्थापना लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. ग्राहकांना वेगवान सेवा देण्यासाठी लक्ष्मणभाऊ हे नेहमीच आग्रही होते. त्यांचीच प्रेरणा घेवून बँकेला पुढे घेवून जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार असल्याची भावना श्री गणेश सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केली.

 

आज (दि. ३०) श्री गणेश बँकेच्या पिंपळे गुरव येथील मध्यवर्ती कार्यालयात निवडून आलेल्या संचालकांची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते शंकर जगताप यांची अध्यक्षपदी, तर संतोष देवकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर शंकर जगताप बोलत होते.

 

आगामी काळात सहकार क्षेत्र हे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळेच लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप, नानासाहेब शितोळे, राजेंद्र राजापूरे, दत्तात्रय उर्फ रावसाहेब चौगुले आणि उद्धव पटेल यांच्या पुढाकाराने सन १९९८ साली बँकेची स्थापना केली होती. लोकनेते लक्ष्मणभाऊ यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे तसेच बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तत्पर सेवा, आकर्षक कर्ज योजना, ठेव योजना यामुळे बँकेकडे ग्राहकांचा ओघ सातत्याने वाढत आहे.

 

काही दिवसांपूर्वी बँकेची पंचवार्षिक (सन २०२३-२०२८) निवडणूक घेतली होती. या निवडणुकीत १७ संचालक बिनविरोध निवडून आले होते. याच संचालक मंडळातून अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून नागनाथ केंजेरी, सहायक शशिकांत शिंगारे, गजेंद्र सवईकर, यांनी कामकाज पाहिले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बाईत, शाखा व्यवस्थापक ईश्वर काटे व अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पुढाकार घेताना बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रथेला सुरुवात केली होती. मात्र, आमदार जगताप हयात नसताना त्यांचे बंधू शंकर जगताप यांनीदेखील हीच परंपरा कायम राखताना ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली होती.

 

नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…

अध्यक्ष : शंकर पांडुरंग जगताप, उपाध्यक्ष : संतोष सखाराम देवकर, कार्यकारिणी सदस्य : राजेंद्र शंकर राजापूरे, दत्तात्रय गोविंद चौगुले, शशिकांत गणपत कदम, संजय गणपत जगताप, उद्धव मुरार पटेल, सुरेश शंकर तावरे, शिवलिंग बसवंत किनगे, अंकुश रामचंद्र जवळकर, मधुकर सोपान रणपिसे, सुरेश तात्याबा शिंदे, शहाजी भगवान पाटील, प्रमोद नाना ठाकर, अभय केशव नरडवेकर. संचालिका : राजश्री बिभिषण जाधव, शैला जनार्धन जगताप.

 

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सहकाराच्या दृष्टीकोनातून दाखविलेल्या विकासाच्या महामार्गावर श्री गणेश सहकारी बँक आपली नियमित प्रगती करत आहे. बँकेवर ज्या पद्धतीने सभासदांनी व खातेदारांनी विश्वास ठेवला, तोच विश्वास आणि बँकेची नियमित प्रगती साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. खातेदारांनी बँकेवर दाखविलेला विश्वास हीच आमच्यासाठी आमच्या कामाची पावती आहे.

– शंकर जगताप, अध्यक्ष, श्री गणेश सहकारी बँक मर्या., पिंपळे गुरव.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *