Spread the love

नाशिक :- शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रामाचे पिंपळस या गावात जावून नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. तसेच शेतकरी सुभाष विठोबा मत्सागर यांचा शेतात काम करत असताना अवकाळी पावसाच्या गारपीटीने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांचीही सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे पीक वाया गेलेले आहे. शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे गेला आहे. सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. विशेष पॅकेजची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही की अनुदान आलेले नाही. अनुदानाची अनेकदा घोषणा केली मात्र ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात अजून वर्ग झालेले नाही. सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्याने पहायला पाहिजे असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

आज जिल्ह्य़ातील दिंडोरी येथे निघणाऱ्या आक्रोश मोर्चाबाबत सांगताना ते म्हणाले की, आज राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचा आणि अवकाळीचा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागते. पाणी टंचाई सामना करावा लागतो आहे. अनेक भागात टँकरचा पुरवठा अद्याप सुरू झालेला नाही. या सगळ्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केलेले आहे. कापसाला दर अजून निश्चित नाही. या सगळ्या समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज दिंडोरी तालुक्यात शेतकरी आक्रोश मोर्चा काढत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *