आमदार महेश लांडगे यांच्या ‘व्हीजन-२०२०’मधील वचनपूर्ती
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षकार आणि वकील बांधवांच्या मागणीनुसार अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले न्यायालय संकुलाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. मोशी येथे सर्व सोयी-सुविधांयुक्त न्यायालय संकूल साकारात आहे. ही इमारत शहराच्या लौकीकामध्ये भर घालणारी ठरेल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुलाच्या भव्य इमारतीचे भूमिपूजन बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभहस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ सा. डॉक्टर आणि पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडचे दिवाणी न्यायाधीश राजेश वानखेडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले-पाटील यांच्यासह विधी क्षेत्रातील मान्यवर आणि वकील, विधीतज्ञ यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
दि. १ मार्च १९८९ साली पिंपरी-चिंचवड न्यायालयाची स्थापना झाली. मात्र, अद्याप इमारतीचा प्रश्न सुटला नव्हता. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘व्हीजन-२०२०’ अभियानांतर्गत न्यायालय संकुलासाठी पाठपुरावा करण्यात आला.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, शहरातील न्यायालयाच्या स्थापनेपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्यासाठी २०१४ पासून आम्ही प्रामाणिकपणे पाठपुरावा केला. राज्याचे नेते तथा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे शहराच्या लौकिकात भर घालणाऱ्या या भव्य वस्तूची पायाभरणी होत आहे. ही पिंपरी-चिंचवडच्या नावलौकीकात भर घालणारी वास्तू निर्माण होईल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाहिलेले एक स्वप्न पूर्ण होत आहे, याचे समाधान वाटते. आगामी दोन वर्षांत या प्रशस्त व भव्य न्यायसंकुलाचे काम पूर्ण होईल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होईल, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.
… असे असेल पिंपरी-चिंचवड न्यायालय!
मोशी येथे एकूण ९ मजले आणि २६ कोर्ट हॉल अशी पिंपरी-चिंचवड न्यायालयाची प्रशस्त इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये रेन रुफ वॉटर हार्वेस्टिंग, प्रशस्त फर्निचर, अग्निशमन यंत्रणा, वाहनतळ, वातानुकुलित यंत्रणा, उद्वहन, सी.सी.टी.व्ही. सिस्टिम अशा आधुनिक सुविधा असतील. जिल्हा न्यायालय , वरिष्ठ स्तर दिवानी न्यायालय , कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय , मोटर व्हेईकल कोर्ट कौटुंबिक न्यायालय , सहकार न्यायालय , कामगार न्यायालय तसेच न्यायाधीशांसाठी निवासस्थान आदींचा समावेश आहे. न्यायसंकुल उभारण्यासाठी पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या हद्दीत बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील सेक्टर नंबर – १४ येथे सुमारे १६ एकर क्षेत्राची जागा महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेली आहे .