रेड झोन प्रश्न सोडविण्यासाठी संरक्षण मंत्र्यांकडे मागणी
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचव़ड शहर, देहूगाव, निगडी प्राधिकरण परिसर, तसेच आयटी पार्कसह असंख्य लोकसंख्येच्या परिसरासाठी ‘रेड झोन’ चा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. या ‘रेड झोन’चा शहर विकासावर व बाधित नागरिकांच्या जिवनमानावर विपरित परिणाम होत आहे. केंद्र सरकार, संरक्षण विभाग आणि प्रशासकीय स्तरावर योग्य विचार होऊन ‘रेड झोन’ बाधितांची कायमची सुटका करून त्यांच्यावरील टांगती तलवार दूर करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात संजोग वाघेरे पाटील य़ांनी देशाचे संरक्षण मंत्री यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संरक्षण विभागाचे दिघी व देहूरोड येथील अॅम्युनिशन डेपोमुळे तेथे ‘रेड झोन’ तयार करण्यात आलेला आहे. या ‘रेड झोन’चा शहर विकासावर व बाधित नागरिकांच्या जिवनमानावर विपरित परिणाम होत आहे. ‘रेड झोन’ मुळे देहूरोड परिसरातील एकूण बारा गावांतील सुमारे ५ हजार एकर जमीन बाधित झालेली आहे. देहूरोड कँटोन्मेंटसह पिंपरी चिंचवड मनपा, पूर्वी कार्यरत असलेल्या नवनगर प्राधिकरणाच्या भागातील असंख्य मिळकती, लघुउद्योग, तळवडे आयटी पार्क, एसआरए प्रकल्प याच ‘रेडझोन’ मुळे बाधित होतात. परिणामी, हजारो कामगार व कित्येक लाखो नागरिक अडचणीत आहेत. त्यांच्यावर ‘ रेड झोन’ची टांगती तलवार कायम आहे. हीच स्थिती पिंपरी चिंचवड शहरातील दिघी रेडझोनच्या बाबतीत देखील आहे.
संरक्षण विभागाच्या स्तरावर हा ५०० ते ७०० मीटर इतकी ‘रेड झोन’ची हद्द असावी, यावर चर्चा झाल्याचे वारंवार सांगण्यात येते. प्रत्यक्षात ‘रेड झोन’ची हद्द २ हजार मीटर इतकी कायम आहे. लाखो नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला हा ‘रेडझोन’ प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात शासन पातळीवर अनास्था आहे. ‘रेड झोन’चा प्रश्न निकाली काढू, याचे फक्त आश्वासन ‘रेड झोन’ बाधितांना मिळत आले आहे. तो निकाली कसा निघेल, याकरिता प्रामाणिक प्रयत्न आणि निर्णयाची आवश्यकता आहे. त्यासाठी पिं. चिं. मनपा आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी व राज्य शासनाच्या स्तरावरून वस्तूस्थीती व योग्य प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करावा. ‘रेड झोन’ बाधितांची कायमची सुटका करून त्यांच्यावरील टांगती तलवार दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तळवडे अग्नितांडवानंतर ‘रेड झोन’ प्रश्न गांभीर्याने घेणं महत्त्वांचं
तळवडेत घडलेल्या अग्नितांडवात १३ महिला कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमागे ‘रेड झोन’मुळे या भागाचा झालेला अनियोजित विकास देखील कारणीभूत आहे. ही बाब विचारात घेता केंद्र सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ‘रेडझोन’पासून या परिसरातील नागरिकांची सुटका कशी करता येईल, या करिता प्रयत्न होणे अत्यावश्यक बनलले आहे. ‘रेड झोन हटाव’ ही शहरवासीयांची आर्त हाक सरकारपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, ही बाब देखील संजोग वाघेरे पाटील यांनी निदर्शनास आणून दिली आहे.