Spread the love

पुणे : प्रतिनिधी

मणिपूरमधील कठीण परिस्थितीतही संघाचे स्वयंसेवक सर्व बाजूंनी कणखरपणे उभे आहेत. संताप, क्रोध, द्वेष विसरुन नागरिकांतील संघर्ष थांबावा म्हणून सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. गेली ४० ते ५० वर्षे समर्पित वृत्तीने कार्य करणारे संघ स्वयंसेवक आणि इतर संघटनांमुळेच पूर्वांचलाची आजची स्थिती सुधारत आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यानी केले.

 

कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिराच्या सभागृहात आयोजित भय्याजी काणे जन्म शताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. देवराव पाटील, प्रमूख पाहुणे विकसक नितीन न्याती, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव, प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कोंडविलकर उपस्थित होते.

 

मणिपूरमधील द्वेषाची आग भडकवू न देता शांत करता आली पाहिजे, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले. ते म्हणाले, “मणिपूरातील आजची परिस्थिती बदलवता कशी येईल असा कृतीशील विचार करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. असे झाल्यास कठीण परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. ही सकारात्मकता उभी राहण्यासाठी प्रत्येकाला आपापल्या परीने योगदान द्यावे लागेल.”जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संघकार्य सुरू असून, संपूर्ण जीवन समर्पित करणारे कार्यकर्ते आहेत. देश म्हणून आपले हे भाग्य आहे. न्याती फाउंडेशनच्या वतीने अशा सर्व उपक्रमात योगदान दिले जाईल. समाजातील प्रबुद्धजनांनीही ते द्यावे, असे आवाहन यावेळी न्याती यांनी केले. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे समन्वयक श्रीपाद दाबक यांनी प्रास्ताविक केले. भय्याजी काणेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहचावे. तसेच भारताच्या पूर्व सीमेलगत शाळांचे जाळे निर्माण व्हावे म्हणून जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे दाबक यांनी सांगितले. कार्यक्रमात सुधीर जोगळेकर यांनी भय्याजी काणे यांचा जीवनपरिचय करून दिला. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. होनराज मावळे यांनी सादर केलेल्या संपूर्ण वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

आणखी दोन पिढ्यांना झिजावे लागेल

देशभक्ती, संस्कृती आणि बलिदान ही भारतीयांना जोडणारी त्रिसूत्री आहे. मात्र अजूनही देशाला उर्जीतावस्था यायला वेळ आहे. पुढील एक दोन पिढ्या यासाठी कार्य करावे लागेल, असे डॉ. भागवत यांनी सांगितले. भारताचा उत्कर्ष ज्यांच्या पथ्यावर पडत नाही. अशा शक्ती सर्व काही ओरबाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *