पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन करण्यासाठी वाकड येथील द्रौपदा लॉन्स येथे प्रत्येक वर्षी पर्यावरण पूरक विसर्जन घाटाची निर्मिती केली जाते. यावर्षीही पर्यावरण पूरक विसर्जन घाटाची निर्मिती करण्यात आली असून नागरिकांनी गणेश विसर्जन करण्यासाठी या विसर्जन घाटाचा उपयोग करावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या गणेश मूर्तींचे प्रमाण वाढले असून त्यामूळे जलप्रदूषणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी गणेश भक्तांनी नदी, नाला, ओढ्यात, विहिरीत मूर्ती विसर्जन करून पर्यावरणास हानी पोहोचवू नये. या उद्देशाने हा विसर्जन हौद निर्माण केला आहे. याठिकाणी सर्व नागरिकांसाठी आणि गणेश मंडळांसाठी पाच फुटापर्यंतच्या गणेश मूर्तीचे विसर्जन तसेच मूर्तीदान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्यानं तो कटाक्षाने टाळायला हवा. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठय़ा आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते, त्यामुळे त्याचाही आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करणे आवश्याक आहे.
सदरील पर्यावरण पूरक विसर्जन घाट ०८ सप्टें. २०२४ पासून खुला करण्यात येत आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत येथे मूर्ती विसर्जन करता येईल. येथे येणाऱ्या सर्व गणेश भक्तांनी गुलाल किंवा अन्य रंगाचा वापर करू नये, निर्माल्य निर्माल्यकुंडातच टाकावे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये व पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा असेही आवाहन विशाल वाकडकर यांनी केले आहे.