‘प्रबोधन पर्व’ भव्य स्वरूपात साजरे करण्याची डॉ. बाबा कांबळेंची ठाम मागणी
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
समता, न्याय, बंधुत्व आणि श्रमसंस्कृतीचा संदेश देणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रबोधन पर्व’ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अधिकृतरीत्या आणि भव्य स्वरूपात साजरे करावे, अशी ठाम आणि परखड मागणी कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केली. या संदर्भात महापालिकेतील काही अधिकाऱ्यांची उदासीनता आणि जाणीवपूर्वक होत असलेले दुर्लक्ष ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडले.
संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमात डॉ. कांबळे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर कडाडून टीका करत सामाजिक न्यायाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवले.
डॉ. बाबा कांबळे यांनी आपल्या भाषणात हरियाणा राज्यातील उदाहरण देत महाराष्ट्रातील प्रशासनाला थेट सवाल केला. “हरियाणात भाजप सरकारने संत रोहिदास महाराजांच्या स्मारकासाठी पाच एकर जागा आणि तब्बल १२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. ‘संत रोहिदास महाराज धाम’ उभारण्याचा निर्णय घेतला जातो, मग महाराष्ट्रात आणि विशेषतः पिंपरी-चिंचवडमध्येच अशी उदासीनता का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महानगरपालिका अनेक महापुरुषांचे प्रबोधन पर्व नियमितपणे साजरे करते. मात्र, संत रोहिदास महाराज यांच्या प्रबोधन पर्वाबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही फाईल प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप डॉ. कांबळे यांनी केला. ही बाब केवळ प्रशासकीय अडथळा नसून, जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
“महानगरपालिकेत बसून महापुरुषांच्या कार्यात अडथळे निर्माण करणारे जातीवादी अधिकारी कोण आहेत, याचा शोध प्रशासनाने घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,” अशी स्पष्ट मागणी त्यांनी यावेळी केली. संत रोहिदास महाराजांचा विचार हा समाजाला एकत्र आणणारा असून, तो दबवण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पिंपरी चौकात महापालिकेच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त भव्य आयोजन करून समता, न्याय, बंधुत्व, श्रम आणि भक्तीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अशा उपक्रमांतूनच सामाजिक सलोखा आणि प्रबोधन साध्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा जयघोष करत करण्यात आला. सामाजिक न्यायाच्या लढ्यात संत रोहिदास महाराजांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
About The Author

