पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीप्रसंगी डॉ. बाबा कांबळे यांची भूमिका स्पष्ट
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
राज्यात टू-व्हीलर टॅक्सीला परवानगी देण्याच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने आक्रमक भूमिका घेतली असून, या निर्णयाविरोधात व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी दिला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि लाखो रिक्षा-टॅक्सी चालकांच्या रोजगारावर होणारा परिणाम लक्षात घेता, ही संकल्पना कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीप्रसंगी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी विजय ढगारे यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यानंतर शहरातील विविध विभागांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, टू-व्हीलर टॅक्सी ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय आहे. खासगी कंपन्यांच्या व्यावसायिक हितासाठी सरकारने असा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. अशा प्रकारच्या धोरणामुळे पारंपरिक रिक्षा-टॅक्सी व्यवसायाला मोठा फटका बसणार असून, हजारो चालक-मालकांच्या उदरनिर्वाहावर संकट निर्माण होईल. त्यामुळे लवकरच जाहीर सभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी पूर्वी झालेल्या कायदेशीर लढ्याचाही उल्लेख केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात बेकायदेशीर टू-व्हीलर टॅक्सीविरोधात संघटनेने यशस्वी न्यायालयीन लढा दिला होता. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली होती. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा अशाच प्रकारचे धोरण राबविण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत संघटनात्मक बदलालाही विशेष महत्त्व देण्यात आले. तब्बल वीस वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची धुरा विजय ढगारे यांच्या हाती सोपविण्यात आली. शांत, संयमी आणि संघटनात्मक कामाचा अनुभव असलेल्या नेतृत्वामुळे रिक्षा चालक-मालकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळेल, असा विश्वास डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला. “वेळेवर नेतृत्वात बदल होणे आवश्यक असते. योग्य वेळी भाकरी फिरवली नाही तर ती करपते, त्यामुळे संघटनेत नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधत नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे,” असे ते म्हणाले.
बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. टू-व्हीलर टॅक्सीच्या परवान्यांविरोधात न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे, गरज पडल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारणे, प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी ‘शिस्त आणि सेवा’ अभियान राबविणे, सर्व रिक्षांमध्ये मीटरचा सक्तीने वापर करणे, मेट्रो स्थानकांवर अधिकृत रिक्षा पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे तसेच प्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्या चालकांवर संघटनात्मक स्तरावर कारवाई करणे, असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या कार्यक्रमात राज्य युवक अध्यक्ष शुभम तांदळे, रिक्षा ब्रिगेडचे राज्य प्रमुख अनिल शिरसाट, शहराध्यक्ष विजय ढगारे, राज्य प्रवक्ते धनंजय कुदळे, कार्याध्यक्ष दीपक ताटे, युवक अध्यक्ष विशाल ससाणे, राज्य उपप्रमुख सुनील कदम, विद्यार्थी वाहतूक विभागाचे अध्यक्ष प्रदीप आयर, शहर संघटक दत्ता गिल्ले, खेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच महिला आघाडी, विद्यार्थी सेना, निगडी विभाग आणि रिक्षा ब्रिगेडच्या विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. संघटनेने आगामी काळात रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रश्नांसाठी अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत या बैठकीतून दिले.
About The Author











