पाणीपुरवठा, नागरी सुविधा आणि नव्या प्रकल्पांवर प्रशासनाला स्पष्ट निर्देश
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास, वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांचा तातडीने विचार करण्यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी महापालिका प्रशासनासोबत सविस्तर आणि दीर्घकालीन नियोजनात्मक बैठक घेतली. या बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक सुविधा, व्यापाऱ्यांचे प्रश्न तसेच शहराच्या सांस्कृतिक व औद्योगिक ओळखीला बळ देणाऱ्या नव्या प्रकल्पांवर सखोल चर्चा करण्यात आली.
शहरातील सांगवी, नवी सांगवी, जुनी सांगवी आणि पिंपळे गुरव हा परिसर झपाट्याने विकसित होत असून लोकसंख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी २० लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्याचा प्रस्ताव आमदार जगताप यांनी मांडला. सांगवी व औंध उरो रुग्णालय परिसरात ही टाकी उभारल्यास या भागातील दीर्घकालीन पाणीटंचाईचा प्रश्न सुटू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच इतर ठिकाणी पाण्याच्या टाक्यांसाठी असलेली आरक्षणे तातडीने विकसित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
किवळे, रावेत, मामुर्डी आणि पुनावळे या वेगाने वाढणाऱ्या उपनगरांमध्ये रस्ते, सार्वजनिक सोयी-सुविधा आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आवश्यक असलेली आरक्षणे महापालिकेने ताब्यात घ्यावीत, अशी ठाम भूमिका आमदार जगताप यांनी मांडली. या भागांमध्ये ‘पब्लिक अमेनिटीज’ विकसित झाल्यास नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील सुमारे १७ हजार नोंदणीकृत टपरी व पथारी व्यवसायिकांचा प्रश्नही या बैठकीत महत्त्वाचा ठरला. या व्यवसायिकांना तात्काळ हॉकर्स झोन उपलब्ध करून देऊन त्यांचा रोजगार सुरक्षित करावा, तसेच शहरातील वाहतूक आणि शिस्त राखण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.
याशिवाय उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानसमोरील मोकळ्या जागेत ‘ऑटोमोबाइल म्युझियम’ उभारण्याच्या संकल्पनेवरही चर्चा झाली. या म्युझियममुळे औद्योगिक वारसा जपला जाईल तसेच शहराच्या औद्योगिक ओळखीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पिंपळे सौदागर व रावेत परिसरात पोस्ट ऑफिससाठी जागा, थेरगाव व पिंपळे सौदागर येथे पोलीस स्टेशनसाठी जागा, सांगवी येथे फुटओव्हर ब्रिज तसेच कोकणे चौकाचा पालिका बाजारच्या धर्तीवर विकास करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
बैठकीनंतर आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. पाणीपुरवठ्यासाठी कालबद्ध नियोजन आखण्यात आले असून आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रकल्प आणि नव्या योजनांना गती देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवला जाईल.
About The Author

