शस्त्रे, मिरवणुका आणि भडकावू घोषणांवर निर्बंध
पुणे : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ३७ (१) व (३) लागू केले आहे. पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला असून तो २७ मे २०२६ रोजी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. हा आदेश ९ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे.
या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विविध प्रकारच्या कृत्यांवर बंदी घालण्यात आली असून नागरिकांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस दाहक पदार्थ, स्फोटके किंवा शारीरिक इजा पोहोचवू शकणारी साधने बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये तलवारी, भाले, काठ्या, दंड, बंदुका तसेच दगडफेक किंवा हल्ल्यासाठी वापरली जाणारी कोणतीही वस्तू घेऊन फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता सभा आयोजित करणे किंवा मिरवणुका काढणे यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा भडकावू भाषणे करणे यांनाही मनाई करण्यात आली आहे.
शहरातील शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक पुतळे, चित्रे किंवा प्रतिमांचे प्रदर्शन अथवा दहन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. समाजात तणाव निर्माण होईल किंवा राज्याच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल अशा प्रकारची वक्तव्ये, प्रचार साहित्य किंवा जनतेमध्ये द्वेष निर्माण करणारे संदेश प्रसारित करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या कृत्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कर्तव्य बजावण्यासाठी शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. कायदेशीर परवानगी असलेल्या सुरक्षा यंत्रणांनाही या आदेशाचा अपवाद लागू राहणार आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करताना उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक वातावरण कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
About The Author









