Spread the love

‘तुमची शिकवणी आमच्या कामाची नाही’; इन्फ्राच्या कामांवरूनही सरकारला घेरले

पुणे : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विरोध करण्याच्या पद्धतीबाबत केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. “आम्ही जो विरोध करतो, तो वस्तुस्थितीला धरून आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आधारित असतो. जनतेचे मुद्दे पुराव्यासकट मांडतो,” असे म्हणत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला.

“बैलगाडीभर पुरावे देण्याचा आपला ‘आदर्श’ विरोध आम्ही बघितलाच आहे; मात्र अद्याप ना आपली बैलगाडी सापडली, ना आपले पुरावे दिसले,” असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला. त्यामुळे विरोध कसा करावा, याबाबत मुख्यमंत्र्यांकडून मिळणारी शिकवण आम्हाला मान्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“आपली विरोध करण्याची मूळ कार्यपद्धती आम्हाला पटणारी नाही. परिणामी आपली शिकवणी आमच्या कामाची नाही,” अशी आक्रमक भूमिका रोहित पवार यांनी घेतली.

याचवेळी त्यांनी मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शिकवणी घ्यायचीच असेल तर मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी कसे वागावे, यासाठी आपल्या मंत्रिमंडळाची आणि आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची शिकवणी घेणे अधिक संयुक्तिक ठरेल,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, राज्यातील इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांवरूनही रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील नागरिकांनी सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा पाहिल्याचा दावा त्यांनी केला. तसेच “इन्फ्राच्या नावाखाली सरकारी तिजोरीला लागलेली गळतीही जनतेने बघितली आहे,” असा गंभीर आरोप करत या विषयावर सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.

रोहित पवार यांच्या या आक्रमक टीकेमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *