केजुदेवी उद्यान-केजुबाई बंधारा परिसराचा कायापालट, बोटिंगसह वॉटर स्पोर्ट्सची धमाल
पिंपरी : प्रतिनिधी
थेरगावच्या नदीकाठाचा चेहरामोहरा आता बदलणार असून, केजुदेवी उद्यान आणि केजुबाई बंधारा परिसराला पर्यटनाचा नवा ‘टच’ मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी ‘वनगंध’ प्रकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली असून, या परिसरात जलक्रीडा पर्यटन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शहराच्या पर्यटन नकाशावर थेरगावची स्वतंत्र ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या मान्यतेनंतर प्रकल्पाला गती मिळाली आहे. थेरगाव येथील बोट क्लब आणि केजुदेवी उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या नावात सुधारणा करून त्यामध्ये जलक्रीडा पर्यटनाचा समावेश करण्यात आला आहे. बारणे यांनी नुकतीच प्रकल्पस्थळाची पाहणी करून कामाच्या नियोजनाची माहिती घेतली. संबंधित विभागाला कामाच्या अंमलबजावणीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
‘वनगंध’ची सर्वात मोठी खासियत म्हणजे नदीकाठावर विकसित होणारे जलक्रीडा पर्यटन केंद्र. बोटिंग जेट्टी, फेरी बोट आणि विविध जलक्रीडांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ नदीकाठ आणि उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसराला मनोरंजन आणि पर्यटनाचे नवे स्वरूप मिळणार आहे.
शहराबाहेर पर्यटनासाठी जाण्याऐवजी नागरिकांना शहरातच निसर्गाच्या सान्निध्यात जलक्रीडा आणि विरंगुळ्याचा अनुभव घेता यावा, अशी या प्रकल्पामागील संकल्पना आहे.
‘वनगंध’ केवळ पारंपरिक उद्यानापुरता मर्यादित राहणार नाही. नदी, निसर्ग, मनोरंजन आणि संस्कृतीचा संगम या प्रकल्पातून घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
प्रकल्प परिसरात भव्य प्रवेशद्वार, आगमन क्षेत्र आणि पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर अॅम्फीथिएटर, समुदाय बैठक व्यवस्था, फोटो बूथ आणि मचान यांसारख्या सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत.
निसर्गप्रेमी आणि कुटुंबांसाठीही ‘वनगंध’मध्ये विविध आकर्षणे असणार आहेत. जॉगिंग ट्रॅक, मुलांचे खेळण्याचे क्षेत्र, नेचर ट्रेल्स, पुष्पोद्यान, इको पार्क आणि वॉच टॉवर उभारण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागा, घाट आणि मंदिर परिसराचीही निर्मिती केली जाणार आहे.
विपुल हिरवाई, नदीचा परिसर आणि विविध सार्वजनिक सुविधांचा मेळ घालत नागरिकांसाठी चैतन्यपूर्ण सार्वजनिक केंद्र उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
शहरातील नदीकाठच्या परिसराचा सार्वजनिक वापर वाढविण्यासोबतच निसर्ग आणि नागरिक यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा उद्देश ‘वनगंध’मागे आहे. प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्यानंतर थेरगावचा हा परिसर नागरिकांच्या विरंगुळ्याचे आणि पर्यटनाचे महत्त्वाचे ठिकाण ठरू शकतो.
“नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा आणि उत्तम विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. ‘वनगंध’मुळे केवळ नदीचे सौंदर्य वाढणार नाही, तर जलक्रीडा पर्यटनाचा नवीन आणि उत्कृष्ट पर्याय नागरिकांना उपलब्ध होईल. नदी, निसर्ग आणि समाज यांना जोडणारा हा आदर्श ठेवा ठरेल”
– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती
About The Author











