इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा पुढाकार; संवेदनशील विषयावर मोकळा संवाद घडवण्याचा प्रयत्न
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, तळेगाव दाभाडे येथे “लैंगिक शिक्षण” या महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि संवेदनशील विषयांबाबत खुलेपणाने संवाद घडावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या व्याख्यानासाठी तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटल आणि पवार हॉस्पिटलमधील ख्यातनाम स्त्रीरोगतज्ञ डॉ. शशिकांत पवार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या अनुभवसंपन्न शैलीत विद्यार्थिनींशी संवाद साधत लैंगिक शिक्षणाचे विविध पैलू उलगडून सांगितले. शरीरस्वच्छता, सुरक्षित संबंध, लैंगिक शोषण व हिंसा यांसारख्या गंभीर विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, चुकीच्या समजुतींमुळे निर्माण होणारे धोके आणि त्यावर योग्य वेळी उपाययोजना करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
लैंगिक शिक्षण हा अजूनही अनेक ठिकाणी निषिद्ध मानला जाणारा विषय आहे. मात्र, अशा विषयांवर खुलेपणाने चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. पवार यांनी व्यक्त केले. विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देत त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. यामुळे उपस्थित विद्यार्थिनींमध्ये जागरूकता वाढण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख डॉ. जी. एस. शिंदे, डॉ. योगेश झांबरे आणि प्रा. मयूर लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रीती यादव (द्वितीय वर्ष डी. फार्म) यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन कु. नयना मोहिते (द्वितीय वर्ष बी. फार्म) यांनी केले.
या कार्यक्रमाला डॉ. पायल थोरात, प्रा. अंकीता बेर्डे, प्रा. निलम पटांगरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, सचिव श्री. चंद्रकांत शेटे आणि खजिनदार सौ. निरुपा कानिटकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने उपक्रम राबवले जात आहेत.
या व्याख्यानामुळे विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण होऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
About The Author

