Spread the love

जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत सदस्यपदी नियुक्ती; मूलभूत सुविधांच्या विकासावर राहणार भर

पुणे । प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील खनिजप्रभावित भागांमध्ये उपलब्ध निधीतून विकासकामांना अधिक प्रभावीपणे गती देण्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान, पुणेच्या नियामक परिषदेत (गव्हर्निंग कौन्सिल) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या ४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून खनिज उत्खननामुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीचा विनियोग करताना स्थानिक गरजा, नागरिकांच्या समस्या आणि विकासाच्या प्राधान्यक्रमांचा विचार करण्याची महत्त्वाची भूमिका नियामक परिषद बजावते. त्यामुळे आमदार लांडगे यांची नियुक्ती ही पुणे जिल्ह्यातील खनिजप्रभावित क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

जिल्हा खनिकर्म अधिकारी तथा नियामक परिषदेचे सदस्य सचिव आनंद पाटील यांनी आमदार लांडगे यांना नियुक्तीबाबत अधिकृत पत्र दिले आहे. शासन निर्णयानुसार संबंधित लोकप्रतिनिधी पदावर कार्यरत असेपर्यंत त्यांचा नियामक परिषदेवरील कार्यकाळ कायम राहणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नियामक परिषदेवरील सदस्यत्वही आपोआप समाप्त होणार आहे.

खनिजप्रभावित भागांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विकासकामांना जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून चालना दिली जाते. या निधीचा योग्य पद्धतीने वापर होणे आणि विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचणे, हे नियामक परिषदेपुढील प्रमुख आव्हान असते.

आमदार महेश लांडगे यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवरील प्रश्न शासनाच्या संबंधित यंत्रणेसमोर मांडण्यासाठी तसेच विकासकामांना प्राधान्य देण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून खनिजप्रभावित भागांमध्ये मूलभूत सुविधा आणि विकासकामांना अधिक गती देण्यासाठी मिळालेल्या जबाबदारीचा प्रभावीपणे उपयोग करू. खनिज निधीचा योग्य, पारदर्शक आणि लोकहितासाठी विनियोग होईल, यासाठी कटिबद्ध राहू,” अशी प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी दिली.

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *