Spread the love

महिला बचत गटाच्या पुढाकारातून कचऱ्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया; रोजगारासोबत स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

कचरा म्हणजे केवळ विल्हेवाट लावण्याची बाब नसून त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यातून रोजगार आणि उत्पन्नाची संधीही निर्माण होऊ शकते, हे दापोडीतील ‘शून्य कचरा प्रकल्पा’तून अधोरेखित होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि वैष्णवी महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या उपक्रमाला उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कचरा संकलनापासून त्यावर प्रक्रिया करण्यापर्यंतच्या संपूर्ण कार्यपद्धतीची माहिती घेतली.

प्रकल्पात काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधत त्यांनी दैनंदिन कामकाज, येणाऱ्या अडचणी आणि उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेतली. कचऱ्याचे स्थानिक पातळीवरच वर्गीकरण व प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा हा उपक्रम परिसरातील स्वच्छतेसोबतच महिला आर्थिक सक्षमीकरणालाही चालना देत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग, आरोग्य विभाग आणि पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. वैष्णवी महिला बचत गटातील सात महिला प्रकल्पाचे दैनंदिन कामकाज सांभाळत आहेत. कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून या महिलांना नियमित रोजगाराची संधी मिळाली असून त्यांच्या उत्पन्नाचा स्रोतही निर्माण झाला आहे.

प्रकल्पात जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते. त्यामुळे ओला कचरा थेट कचरा डेपोवर जाण्याचे प्रमाण कमी होते. दुसरीकडे प्लास्टिक कचऱ्याचेही वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापासून बेंच, पेव्हिंग ब्लॉक यांसारख्या विविध उपयुक्त वस्तू तयार केल्या जात आहेत.

कचऱ्याचे पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीच्या माध्यमातून त्याचे मूल्यवर्धन करण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जात आहे. परिणामी कचऱ्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच परिसरातील स्वच्छता राखण्यास मदत होत आहे.

स्थानिक पातळीवर कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याने त्याची वाहतूक करून मोशी येथील कचरा डेपोवर नेण्याची गरज कमी होते. त्यामुळे कचरा वाहतूक व्यवस्थेवरील ताण आणि डेपोवरील भार कमी करण्यास या उपक्रमाची मदत होत आहे. कचरा निर्माण होतो त्याच परिसरात त्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरण यांची सांगड घालण्यात आली आहे. कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू तयार करून त्यातून उत्पन्न मिळविणाऱ्या महिला इतर बचत गटांसाठीही प्रेरणादायी ठरत आहेत. स्वच्छता, कचरा पुनर्वापर आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही बाबींचा समन्वय या उपक्रमातून साधला जात आहे.

पाहणीवेळी सहाय्यक आरोग्य निरीक्षक राजेश भाट, अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक ओंकार शिवरकर, प्रभारी आरोग्य निरीक्षक उमेश जाधव, समाज विकास विभागाच्या समूह संघटिका वैशाली लगडे, योजक संस्थेच्या सिनिअर मॅनेजर सेजल जोशी यांच्यासह प्रकल्पातील महिला उपस्थित होत्या.

“दापोडीतील शून्य कचरा प्रकल्प हा स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम आहे. कचऱ्यापासून खत आणि विविध उपयुक्त वस्तू तयार केल्या जात आहेत. या उपक्रमामुळे महिलांना रोजगार व आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन त्यांचा विस्तार करण्यासाठी महानगरपालिका स्तरावर आवश्यक सहकार्य केले जाईल,” असे उपमहापौर शर्मिला बाबर यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *