नगरसेविका शैलजाताई मोरे ‘ऑन ग्राउंड’; गळती, अस्वच्छता, पाणी-सुरक्षेचा अभाव अन् विद्युत दाहिनी बंद
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
शहराच्या विकासाचे मोठमोठे दावे केले जात असताना मृत्यूनंतर नागरिकांना सन्मानाने अंत्यविधी करता यावा, यासाठी आवश्यक असलेल्या स्मशानभूमींच्या मूलभूत सुविधांकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांनी मंगळवारी शहरातील विविध स्मशानभूमींचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करून प्रशासनाच्या कारभाराची अक्षरशः चिरफाड केली. निगडी, किवळे, मामुर्डी, चिंचवड-केशवनगर आणि देहूरोड-शितळानगर येथील पाहणीत अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
स्मशानभूमी हा संवेदनशील विषय असूनही येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा, बसण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा यांचा अभाव असल्याचे पाहणीत दिसून आले. काही ठिकाणी छताला गळती, तर काही ठिकाणी कचरा आणि वाढलेले गवत आढळले. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या सन्मानाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मशानभूमींच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करूनही समाधानकारक कार्यवाही न झाल्याने मोरे यांनी थेट ‘ऑन ग्राउंड’ उतरून वस्तुस्थिती जाणून घेतली. नागरिक तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी समस्यांची माहिती घेतली. यावेळी नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे आणि नगरसेवक सुरेश भोईर उपस्थित होते.
निगडी स्मशानभूमीत विद्युत दाहिनीच्या छताला गळती असून खिडक्या फुटलेल्या आहेत. एका ट्रॉलीवरून मृतदेह खाली पडण्याचा धोका असल्याचेही निदर्शनास आले. जनरेटरजवळ पाणी साचणे, पाईप फुटणे, परिसरात कचरा, पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि जुने फिल्टर यामुळे सुविधांची अवस्था गंभीर आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट, मास्क आणि गणवेश उपलब्ध नसल्याची बाबही समोर आली. अनेक वर्षे सेवा करूनही कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेसह वेतनवाढ आणि ग्रॅच्युईटीचा प्रश्न प्रलंबित असल्याचे मोरे यांनी सांगितले.
किवळे स्मशानभूमीत स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पिण्याचे पाणी, प्रकाश, सभामंडप, स्पीकर आणि माईकसारख्या सुविधांचीही कमतरता आहे. परिसरात गवत वाढले असून कचरा वेळेवर उचलला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. नदीकाठच्या भागात पेव्हिंग ब्लॉक व सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आहे. ड्रेनेज नदीत सोडण्यात आल्याचा गंभीर मुद्दाही पाहणीत समोर आला.
मामुर्डीतील स्मशानभूमीत छताला गळती, अपुरी स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि प्रकाशाची समस्या आहे. नदीकाठच्या पायऱ्यांवर सुरक्षा ग्रील नसल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेश विसर्जन घाट आणि स्मशानभूमी एकाच ठिकाणी असल्याने तेथे गैरप्रकार घडत असल्याचेही निदर्शनास आले. अरुंद रस्ता आणि अपुऱ्या सुविधांमुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चिंचवड-केशवनगर येथील विद्युत दाहिनी परिसरात स्वच्छतागृह नादुरुस्त असून पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. सुरक्षा रक्षकांसाठी केबिन, कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बाथरूम, पंखे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध नसल्याचे दिसून आले. पायऱ्यांना सुरक्षा ग्रील नसून कचरा साचला आहे. अंत्यविधीनंतर नागरिकांना उघड्यावर अंघोळ करावी लागत असल्याने महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र सुविधा उभारण्याची मागणी करण्यात आली.
देहूरोड-शितळानगर येथील विद्युत दाहिनी वीजबिल थकीत असल्याने बंद असल्याचे समोर आले. तब्बल ८ लाख ५० हजार ३६० रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली. स्मशानभूमीत कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
स्मशानभूमीतील समस्या केवळ दुरुस्तीपुरत्या मर्यादित नसून त्या नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाशी निगडित असल्याचे शैलजाताई मोरे यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने प्रत्येक स्मशानभूमीतील समस्यांची तातडीने नोंद घेऊन कालबद्ध पद्धतीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पाहणी दौरा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
About The Author











