विदर्भ-मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये ‘मागेल त्याला मुरघास’ योजना; पात्र पशुपालकांना प्रति किलो ३ रुपये अनुदान
पुणे : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध व्हावा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता यावे, यासाठी पशुसंवर्धन विभागाने ‘मिशन मुरघास’ मोहिमेला गती दिली आहे. हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासामध्ये रूपांतर करून भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारकडून ७६.४१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकरी व पशुपालकांसाठी ‘मागेल त्याला मुरघास’ ही विशेष योजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.
राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जनावरांना पुरेसा चारा मिळणे हे पशुपालकांसमोर मोठे आव्हान आहे. चारा टंचाईमुळे जनावरांच्या आरोग्यावर, दुग्धोत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे चारा उत्पादन वाढविणे आणि उपलब्ध चाऱ्याची साठवणूक करणे यावर भर देण्यात येत आहे.
सन २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी यापूर्वी जिल्हा वार्षिक योजनेतून वैरण बियाणे वाटपासाठी ४८.२० कोटी रुपये, तर विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत ३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आता चारा टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी अनुक्रमे ६६.४१ कोटी आणि १० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात चारा लागवड करून मुरघास निर्मिती वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.
‘मिशन मुरघास’अंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांना मुरघास तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. चाऱ्याची योग्य वेळी कापणी, त्याची कुट्टी, योग्य दाबणी आणि हवाबंद साठवणूक या प्रक्रियांवर मार्गदर्शन केले जाईल. मका, ज्वारी आणि नेपिअर यांसारख्या चारा पिकांपासून मुरघास निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
दूध सहकारी संघ, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट, कृषी विज्ञान केंद्रे आणि ग्रामस्तरीय यंत्रणांच्या सहभागातून गावोगावी प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत.
विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील या योजनेत पात्र पशुपालकांना प्रति जनावर प्रतिदिन ५ किलो मुरघास, ९० दिवसांसाठी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रतिकिलो ३ रुपये अनुदान देय आहे. मुरघास खरेदीचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
इच्छुक पशुपालकांनी [अधिकृत संकेतस्थळ – https://vmddp.com येथे ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक जिल्ह्याने वैरण बियाणे वाटप, चारा उत्पादन आणि मुरघास निर्मितीसाठी उद्दिष्टे निश्चित करून कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे पोषण टिकविणे, दुग्धोत्पादनाला आधार देणे आणि पशुपालकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे शक्य होईल, असा विश्वास पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.
About The Author

