Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष तपासणी मोहीम; २ लाख १५ हजारांचा दंड, ऑनलाइन सेवा कंपन्यांनाही नोटिसा

पुणे : प्रतिनिधी

प्रवासी वाहतुकीसाठी परवाना घेतलेल्या वाहनांचा नियमबाह्य पद्धतीने मालवाहतुकीसाठी वापर करणाऱ्या वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणारी १८ वाहने आढळून आली असून, संबंधित वाहनांवर एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळे ऑनलाइन सेवांशी संबंधित वाहनांच्या वापराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोर्टर, ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या ऑनलाइन माध्यमातून सेवा देणाऱ्या कंपन्यांशी संबंधित वाहनांचा वापर प्रवासी वाहतुकीऐवजी मालवाहतुकीसाठी केला जात असल्याच्या तक्रारी आरटीओ प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत वाहनांची कागदपत्रे, परवाने आणि प्रत्यक्ष वापर तपासण्यात आला. त्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ६६ आणि १९२ नुसार परिवहन वाहनांचा वापर करताना आवश्यक परवाना घेणे आणि त्यातील अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. वाहनाला ज्या उद्देशासाठी परवाना देण्यात आला आहे, त्याच उद्देशासाठी त्याचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी असलेल्या वाहनाचा अनधिकृतपणे मालवाहतुकीसाठी वापर केल्यास संबंधित वाहनमालक आणि चालक कायदेशीर कारवाईस पात्र ठरू शकतात.

वाहनांचा व्यावसायिक वापर करताना नियमांचे पालन करणे आवश्यक असते. मात्र, ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून सेवा देताना वाहनांच्या वापरासंबंधीच्या अटींकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आरटीओने तपासणी अधिक गांभीर्याने सुरू केली आहे.

तपासणी मोहिमेत आढळलेल्या नियमभंगाच्या प्रकरणांनंतर संबंधित ऑनलाइन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांद्वारे त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित कंपन्या काय स्पष्टीकरण देतात आणि प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

प्रवासी वाहतुकीसाठी नोंदणी आणि परवाना घेतलेल्या वाहनांचा अनधिकृतपणे मालवाहतुकीसाठी वापर करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. ऑनलाइन आधारित सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनीही वाहनांच्या वापराबाबत लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, नियमभंग रोखण्यासाठी यापुढेही नियमित तपासणी केली जाणार आहे. अशा प्रकारचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनमालक आणि चालकांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आरटीओ प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या परवान्यांबाबत तसेच त्यांच्या प्रत्यक्ष वापराबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *