११८ सत्रांतून ११ हजार ६३० विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्यजागृतीचा संदेश; ११ हजार ९७ विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक शपथ
पुणे : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासह व्यसनमुक्ती, आत्महत्या प्रतिबंध आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर आरोग्याचा’ या अभियानाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १३ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ११८ आरोग्यजागृती सत्रांच्या माध्यमातून तब्बल ११ हजार ६३० विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचविण्यात आला. यापैकी ११ हजार ९७ विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक शपथ घेत निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, आरोग्याच्या समस्यांविषयी वेळेत जागरूकता निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविण्यात आला.
पुणे जिल्ह्यात या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी (MUHS) संलग्न महाविद्यालयांच्या माध्यमातून ८१ सत्रे घेण्यात आली. आयुष महाविद्यालयांनी ३३ सत्रांचे आयोजन केले, तर अन्य संस्थांच्या सहभागातून चार सत्रे पार पडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवत आरोग्यजागृतीच्या कार्याला हातभार लावला.
या अभियानाच्या माध्यमातून वैद्यकीय आणि आरोग्यविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आरोग्याशी संबंधित विविध विषयांची माहिती सोप्या पद्धतीने समजावून सांगत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जिल्ह्यात अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाने सर्वाधिक ११ आरोग्यजागृती सत्रांचे आयोजन केले. या सत्रांमध्ये ६९३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, या सर्व ६९३ विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक शपथ घेतली. आरोग्यविषयक संदेश विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचावा, या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले.
अभियानांतर्गत मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध, व्यसनमुक्त जीवन, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आणि भावनिक आरोग्यही महत्त्वाचे असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यजागृती निर्माण करून व्यसनमुक्त, निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण पिढी घडविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरुणाईच्या आरोग्यातूनच महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडेल.” या अभियानात योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजविणे आणि त्यांना स्वतःच्या आरोग्याप्रती जबाबदार बनविणे, या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील हे अभियान महत्त्वपूर्ण ठरले.
About The Author

