Spread the love

भोसरीतील आढावा बैठकीत मतदार संपर्क अभियानाला गती देण्याच्या सूचना; डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे निर्देश

 

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्यासाठी संघटनात्मक ताकद पणाला लावा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी संपर्क यंत्रणा उभी करा आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करत विजयाचे लक्ष्य साध्य करा, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले. भोसरी विधानसभा मतदारसंघात आयोजित भाजपाच्या आढावा बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना विजयासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीला नगरसेवक, मंडल अध्यक्ष, निवडणूक प्रभारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकारी उपस्थित होते. निवडणुकीतील प्रचाराचे नियोजन, मतदारांशी संपर्क, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणी आणि प्रचार यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी या प्रमुख विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे लांडगे यांनी सांगितले. दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत मिळवून देण्यासाठी मतदारांशी थेट संवाद साधणे, त्यांच्यापर्यंत उमेदवारांची माहिती पोहोचवणे आणि संपर्क अभियान अधिक व्यापक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीत यश मिळवण्यासाठी केवळ प्रचारावर अवलंबून न राहता प्रत्येक मंडलातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात. मतदारांच्या यादीचा अभ्यास करून प्रत्यक्ष भेटीगाठींना प्राधान्य द्यावे. पदवीधर आणि शिक्षक मतदारांच्या प्रश्नांची माहिती घेऊन त्यांच्या अपेक्षा समजून घ्याव्यात. संपर्क अभियानात कोणतीही उणीव राहणार नाही, यासाठी सर्वांनी सातत्याने समन्वय ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनानुसार पुण्यासह पाचही जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहन लांडगे यांनी केले. पक्षाची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची सक्रियता आणि नियोजनबद्ध प्रचार यांच्या माध्यमातून निवडणुकीत अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.

“संघटनात्मक एकजूट हीच भाजपाची ताकद आहे. प्रत्येक मंडलाने जबाबदाऱ्यांचे स्पष्ट नियोजन करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे. पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. डॉ. स्मिता योगेश जाधव आणि कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या विजयासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. संघटित प्रयत्नांच्या बळावर विजयाचा संकल्प पूर्ण होईल, असा विश्वास आहे,” असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

दिलेल्या माहितीनुसार, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वीच्या कालावधीत मतदार संपर्क अधिक प्रभावी करण्यावर भाजपाने भर दिला आहे. पात्र मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत द्यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

कार्यकर्त्यांची ऊर्जा, संघटनेतील समन्वय आणि विजयासाठीची बांधिलकी यांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *