Spread the love

नगर परिषदेत अभिवादन; मान्यवरांनी विचारांचा जागर केला
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगराध्यक्ष श्री. संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी नगरसेवक श्री. शिवाजी आगळे, श्री. विनोद भेगडे, तसेच नगरसेविका सौ. आशा अशोक भेगडे, सौ. हेमलता खळदे, सौ. भारतीताई धोत्रे, सौ. शोभाताई परदेशी आणि कु. शिया चिमटे यांची उपस्थिती होती. याशिवाय मुख्याधिकारी श्री. गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड, सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय बाविस्कर यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष श्री. संतोष दाभाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी आंबेडकरांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत आजच्या पिढीने त्यांच्या तत्वांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
मुख्याधिकारी श्री. गिरीश दापकेकर यांनीही आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. भारतीय संविधान निर्मितीतून त्यांनी देशाला दिलेली दिशा आणि समाजातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य याबद्दल त्यांनी विशेष उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण वातावरणात आदर आणि कृतज्ञतेची भावना दिसून आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *