Spread the love

सूरगंधर्व साखळकर आणि पं. आल्पे यांच्या गौरव सोहळ्याची मेजवानी

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे येथे येत्या २५ एप्रिल रोजी संगीतप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी सजणार असून “देणे गंधर्व युगाचे” या विशेष नाट्यसंगीत कार्यक्रमातून गंधर्व परंपरेचा सुरेल मागोवा घेण्यात येणार आहे. कै. सौ. कमलिनी पुरुषोत्तम परांजपे स्मृती पुष्प २०२६ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात सूरगंधर्व पं. सुरेश साखळकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त तसेच सुप्रसिद्ध गायक पं. विनोद भूषण आल्पे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कै. डॉ. शं. वा. परांजपे नाट्य संकुल, कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. गंधर्व परंपरेतील अमूल्य ठेवा असलेल्या नाट्यसंगीताची समृद्ध परंपरा या कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडली जाणार आहे.

या विशेष सादरीकरणात संपदा थिटे, पं. विनोद भूषण आल्पे आणि पं. सुरेश साखळकर हे मान्यवर कलाकार आपल्या गायनातून बालगंधर्व, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व आणि देवगंधर्व यांच्या सांगीतिक वैभवाचा अप्रतिम आविष्कार सादर करणार आहेत. त्यांच्या सादरीकरणाला संजय गोगटे, माधव मोडक आणि सुरेश कुलकर्णी यांची सुरेल साथ लाभणार आहे.

कार्यक्रम प्रमुख मंगेश राजहंस, अध्यक्ष विनायक अभ्यंकर आणि कार्याध्यक्ष अंजली सहस्त्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, गंधर्व युगातील संगीत वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहून या सुरेल पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संगीत विभाग प्रमुख लीना परगी यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *