Spread the love

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी

शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत घराघरांत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांसाठी यंदाची दिवाळी आर्थिकदृष्ट्या अधिक आनंदाची ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ७ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेल्या या आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा झाला असून, आशा स्वयंसेविकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे.

महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) शहरातील झोपडपट्ट्या तसेच झोपडपट्टीसदृश भागांमध्ये गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा म्हणून या महिला काम करतात. माता-बालकांचे आरोग्य, लसीकरण, गर्भवती महिलांची देखभाल, आरोग्यविषयक जनजागृती, विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे यांसारख्या जबाबदाऱ्या त्या पार पाडतात. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीतही त्या नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.

या कामाची दखल घेत महापालिकेने आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सप्टेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ हा बारा महिन्यांचा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे. या कालावधीत किमान सहा महिने म्हणजेच १८० दिवस काम केलेल्या आशा स्वयंसेविकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या कामाच्या निकषांनुसार किमान ७ हजार रुपये, तर कमाल १५ हजार रुपये इतका प्रोत्साहन भत्ता निश्चित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या भत्त्याचा आर्थिक भार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील कुटुंब कल्याण अंतर्गत असलेल्या ‘बोनस तथा सानुग्रह अनुदान’ या लेखाशीर्षातून भागविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र आशा स्वयंसेविकांना सणासुदीच्या काळात आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

याबाबत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून आशा स्वयंसेविका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या निरंतर सेवेचा सन्मान व्हावा आणि दिवाळीच्या निमित्ताने त्यांना आर्थिक हातभार लागावा, या भावनेतून या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे आशा भगिनींना योग्य न्याय मिळाला असून, त्यांची दिवाळी अधिक आनंदात साजरी होईल, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या कामाची दखल घेत आर्थिक प्रोत्साहन देण्याचा हा निर्णय त्यांच्या मनोबलात वाढ करणारा ठरणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *